शरद पवार यांची हकालपट्टी म्हणजे राष्ट्रवादीत फूटच; संजय राऊत यांचं मोठं विधान
महाराष्ट्रात आणि देश पातळीवर भाजपचा पराभव करायचा आहे. अजित पवार कुठे आहेत? त्यांचा गट कुठे आहे? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. आम्ही जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. आम्ही तटकरे यांच्याशी चर्चा करत नाही.
मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आमचे नेतेच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान यांनी मोठं विधान केलं आहे. अजितदादा गटाने शरद पवार यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही फूट नाही तर काय आहे? राष्ट्रवादीत दोन दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. ही फूट नाही तर काय आहे? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. इंडिया अलायन्सचे ते प्रमुख घटक आहेत. या महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरू आहे. राष्ट्रवादीत फूट पडली की नाही हे जनता ठरवेल. माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. जशी शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा झाला. पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून भाजपबरोबर हातमिळवणी केली. हा पक्ष द्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. ही फूट आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीतून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरुद्ध भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्या पक्षाने अजित पवार यांच्यासह काही नेत्यांची हकालपट्टी केली. त्याला फूट नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. ही फूटच आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आम्ही फूटच मानतो
या राज्यात राष्ट्रवादीचे दोन अध्यक्ष आहेत. एक जयंत पाटील आणि दुसरे सुनील तटकरे. ही फूट नाही का? अजित पवार गटाने शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. याला आम्ही फूट मानतो. लोकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. लोकांनी ठरवलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडलीय. एका गटाने ईडीच्या भीतीने भाजपशी हात मिळवणी केली आहे. ही फूटच आहे, असं राऊत म्हणाले.
पवार भाजपसोबत जाणार नाहीत
शरद पवार यांचे दोन्ही दगडांवर पाय आहेत काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचे दोन्ही दगडावर पाय नाहीत. ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत. त्यांची विचारधारा ती नाही. त्यांच्या विचारधारेत भाजपचा विचार मान्य नाही. जनतेत अजिबात संभ्रम नाही.
अशा व्यक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणावर ओरखडा उमटणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उभी केली. ती गरुडझेप घेताना दिसत आहेत. शरद पवारही फुटीनंतर पक्षाची सूत्रे हाती घेऊन राज्यात फिरत आहेत. त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळत आहे, असं त्यांनी स्पेष्ट केलं.