जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबारात बळी, मृतकाचे नातेवाईक आक्रमक, शताब्दी रुग्णालयासमोर आक्रोश
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी शताब्दी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. रेल्वे पोलीस योग्य माहिती देत नसल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
मुंबई | 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफने केलेल्या गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झालाय. चेतन कुमार सिंह असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव आहे. आरोपीने सायलन्ट गनमधून 12 गोळ्या झाडल्याची माहिती जीआरपीने दिली आहे. पहाटे पाच वाजता वापी ते पालघर स्थानकादरम्यान ही घटना घडली. मृतकांमध्ये तीन प्रवासी आणि एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. आरोपी चेतन कुमार सिंहची सध्या चौकशी सुरु आहे. या गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आता आक्रमक झाले आहेत.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी शताब्दी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. मृतक अजगर आली यांच्या नातेवाईकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. घटनेला 12 तास उलटले तरी रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत कोणतीच माहिती मिळत नाही. मृतकांच्या नातेवाईकांना शासन काय मदत करणार? याची घोषणा केली नाही, असं मृतकांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
रायपूर येथील अजगर आली यांचा यात मृत्यू झाला आहे. त्यांचे हे नातेवाईक आहेत. मयतांचे मृतदेह हा रायपूरला घेऊन जायचे आहे. त्याचा खर्च कोण करणार? असे प्रश्न आहेत. यासाठी मृतकाच्या नातेवाईकांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. धरणे सुरू होताच पोलिसांची व्हॅन दवाखान्यात दाखल झालीय.
नेमकं काय घडलं?
जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन जयपूरहून मुंबईकडे येत होती. पहाटे पाचच्या सुमारास ट्रेन गुजरातच्या वापी येथून पुढे आली. ट्रेन वापी आणि पालघरमध्ये असताना आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमार सिंहने गोळीबार केला. B5 आणि B6 क्रमांकाच्या बोगीत हा प्रकार घडला. गोळीबारात तीन प्रवासी आणि आरपीएफच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. दहिसर स्थानकाजवळ ट्रेनची चेन खेचण्यात आली. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी आरपीएफटच्या इतर कर्मचाऱ्यांनी आरोपी कॉन्स्टेबलला शस्त्रासह ताब्यात घेतलं.
आरोपी आरपीएफ चेतन कुमार सिंह हा उत्तर प्रदेशच्या हाथरसचा रहिवासी आहे. तो 2 डिसेंबर 2009 पासून आरपीएफमध्ये नोकरीला आहे. आरोपी चेतन सिंहचे वडीलही डीआरपीमध्ये असल्याची माहिती आहे. चेतन कुमार सिंहने जानेवारी महिन्यात मुंबईत बदली मागितली होती. वृद्ध आईच्या प्रकृतीमुळे चेतन सिंहने मुंबईत बदली मागितली होती.