Aaditya Thackeray | ‘तेव्हा बिळाच्या बाहेर येतात’, अमित ठाकरे यांचे जिव्हारी लागणारे शब्द, आदित्य म्हणाले…
Aaditya Thackeray | स्थगिती मिळाल्यावर बिळाच्या बाहेर येतात, असं अमित ठाकरे सरळ म्हणाले होते. सिनेट निवडणूक स्थगिती मुद्यावरुन दोन युवा ठाकरेंमध्ये जुंपली आहे. "तुम्ही कुणाचं नाव घेतलं आता आदित्यचं ना…हं… त्यांच्याविषयीच बोलतो"
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित झाल्या आहेत. त्यावरुन सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुका स्थगित करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डरपोक म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकार निवडणूक घ्यायला घाबरत असा आरोप त्यांनी केला. अमित ठाकरे यांनी सुद्धा निवडणूक स्थगितीच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
आता याच सिनेट निवडणूक स्थगितीच्या मुद्यावरुन दोन ठाकरेंमध्ये सुद्धा जुंपली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. “निवडणुकीवेळी हे लपून बसतात. स्थगिती मिळाल्यावर बिळाच्या बाहेर येतात. निवडणुकीत उतरा ना. तुम्ही कुणाचं नाव घेतलं आता आदित्यचं ना…हं… त्यांच्याविषयीच बोलतो” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आज आदित्य ठाकरे यांना या बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले की, “मी काही लोकांवर बोलत नाही, त्यांना टिका करु दे. मिंधे-भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रम जाहीर झाल्यावर निवडणुका स्थगित होणं धोकादायक आहे. लोकसभेच्या निवडणुकाही अशाच स्थगित होऊ शकतात. देशात लोकशाही नाही, अशा पद्धतीने वाटचाल सुरु आहे”
कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवण्यावर आदित्य काय म्हणाले?
कर्नाटकात बागलकोट येथे शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “लोक योग्य ती प्रतिक्रिया देणारच आहेत. मात्र, या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे? हे पाहणं गरजेचं आहे”
तो भुजबळांचा बालेकिल्ला नाही
“बालेकिल्ला कोणाचाही नसतो. मी मागच्या वेळीसुद्धा कोणावरही टीका केली नाही. मी युवकांशी चर्चा कऱ्याल चाललो आहे. कॉलेजेस सोबत कार्यक्रम आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘बाकी पक्षांचा रिजेक्टेड माल’
भाजपामध्ये 70% डुप्लीकेट आहेत, या नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. “भाजपचे अनेक लोक हेच सांगायला लागेल आहेत. महाराष्ट्र भाजपची परिस्थिती अशी झाली आहे की, 2 पक्ष, एक परिवार फोडला आणि हे सगळं करून, घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपला काय मिळालं? त्यांचे फक्त 5-6 नेते आहेत, बाकी सगळं इम्पोर्टेड माल आहे. तोही बाकी पक्षांचा रिजेक्टेड माल आहे” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ‘भाजपला सुद्धा ते डरपोक आहेत हे पटलेलं आहे’
“एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं? हा विचार त्यांचे कार्यकर्तेही कधी ना कधी करणारच आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मुख्यमंत्री डरपोक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपला सुद्धा ते डरपोक आहेत हे पटलेलं आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.