भक्तांनो, सावध राहा… 2024 च्या निवडणुकीवेळी धर्मांध अफूचं पीक येणार!; सामनातून आगामी निवडणुकीवर भाष्य
Saamana Editorial on Loksabha Election 2024 : 2024 ची निवडणूक, अफूचं पीक अन् मंदिरांचा वापर; सामनातून आगामी 2024 च्या निवडणुकीवर भाष्य
मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : 2024 ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशात या निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापतंय. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या निवडणुकीवर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘अफूच अफू…!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरेबंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळय़ा वाजवून, घंटा बडवून कोरोना पळाला नाही . महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला . गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली . तेथे धर्म होताच , पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले . 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे . 21 मंदिरांचा वापर त्यासाठी होईल . भक्तांनी आता सावध राहावे , इतकेच !
देशात असंख्य प्रश्नांचे थैमान सुरू आहे. मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत प्रश्नच प्रश्न दिसत आहेत. त्यावर सरकारकडे कोणताही तोडगा नाही. पालघर येथे जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये एका माथेफिरू जवानाने गोळीबार करून चारजणांचा बळी घेतला. हे त्या धर्मांध अफूच्या सेवनाचेच परिणाम आहेत.
हरयाणातही जातीय तणावाचा वणवा पेटवण्यात आला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे-धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळय़ा दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून 13 हजार कोटी रुपये खर्च करून देशात 21 भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत.
मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपला साधली आहे व त्यासाठी बागेश्वर बाबा, मनोहरपंत भिडे, रामरहिम असे बाबा लोक त्यांनी हाताशी ठेवले आहेत.
2024 च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील. 2009 व 2014 साली सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. परदेशातील काळा पैसा परत आणणे, देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करणे, गरिबी, महागाईचे उच्चाटन करणे, बेरोजगारी नष्ट करणे, कश्मिरी पंडितांची घर वापसी करणे, देशाच्या दुश्मनांना धडा शिकवणे, वीर सावरकरांना भारतरत्न देणे, अशा अनेक घोषणा मोदी सरकारने चुलीत घातल्या आहेत आणि 21 मंदिरांची उभारणी करून भाजपने 140 कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले आहे.
देशात संरक्षण सामग्री बनत नाही. राफेलसारखी लढाऊ विमाने फ्रान्स-अमेरिकेकडून हजारो कोटींना विकत घ्यावी लागतात हे काही आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही. त्या राफेलच्या व्यवहारातही कमिशनबाजी झाली आहे. देशात गोमांस, समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, हनुमान चालिसा अशा विषयांवर धार्मिक तणाव निर्माण करायचे व त्या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुकांना सामोरे जायचे हे भाजपचे नित्याचेच धोरण. त्यात आता मंदिरांची भर पडली. मणिपुरातील हिंसाचारात अनेक मंदिरांची हानी झाली. कश्मीर खोऱ्यात मंदिरे धोक्यात आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे बोलघेवडे मौन पाळून बसतात.