Eknath Shinde | मुंबईच्या ‘या’ भागात शिंदे गटाला बसू शकतो मोठा झटका, एकाचवेळी 150 कार्यकर्ते शिवसेना सोडणार?
Eknath Shinde | अंतर्गत गटबाजीला कार्यकर्ते कंटाळले? महिला शिवसैनिकाच्या दाव्यानुसार, यात 40 गटप्रमुख, 10 उपशाखाप्रमुख आहेत. मुंबईत शिंदे गटाचे शिवसैनिक कोणावर नाराज आहेत? एकनाथ शिंदे यांना लिहिलं पत्र.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेनेला भक्कम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण मुंबईत अजूनही ठाकरे गटाची ताकत जास्त आहे. मागच्यावर्षी शिवसेना फुटली. त्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातून एक-एक नेता फुटून शिंदे गटात येतोय. अलीकडे हा ओघ वाढला आहे. त्यामुळे ठाकरे गट हळूहळून कमकुवत होत चालला आहे. त्याचवेळी शिंदे गटातही सर्वकाही आलबेल नाहीय. मुंबईत शिंदे गटात धुसफूस वाढत चालल्याच दिसतय.
मागच्या आठवड्यात कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली होती. ‘सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करु दिले जात नाही’, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
मुंबईत शिंदे गटात कुठे नाराजी?
“आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या”, असं पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं होत. आता असाच प्रकार जागेश्वरीमध्ये सुद्धा घडू शकतो. जोगेश्वरीतील नाराज शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ते विभाग प्रमुख विजय धीवार यांच्या जाचाला कंटाळले आहेत.
कोणावर राग?
विजय धीवार यांच्या जाचाला कंटाळलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. “एकनाथ शिंदे 24-24 तास काम करतात. मी सुद्धा त्यांच्यासारखा स्वत:ला झोकून देऊन काम करतोय. पण माझ्याविरोधात कटकारस्थान रचलं जातय. दोन महिने शाखा बंद आहे. तोंडी बोललो, लेखी निवेदन दिलं. त्यांनी काही हालचाल केली नाही. बाळासाहेब भवनला पत्र लिहिलं. आता आम्ही सर्व सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारी आहोत” असं नाराज शिवसैनिकाने म्हटलं आहे. महिला शिवसैनिकाने काय सांगितलं?
दुसऱ्या बाजूला महिला शिवसैनिकाने आपली खंत व्यक्त केली. “पक्षात आल्यानंतर दोन महिने व्यवस्थित गेले. पण विभागप्रमुखाची निवड झाल्यानंतर संघटना तुटायला सुरुवात झाली. माझ्या जागेवर कोणाची तरी नियुक्ती करायची. आम्ही तुम्हाला काढून टाकणार अंस सुरुवातीपासून सांगितलं गेलं. आम्ही कामात चुकत असू, तर आम्हाला दाखवा ना. माझ्या सोबत 150 शिवसैनिक राजीनामा देणार” असं या महिला शिवसैनिकाने दावा केला. यात 40 गटप्रमुख, 10 उपशाखाप्रमुख आहेत.