BREAKING : शिंदे सरकार मविआच्या दोन नेत्यांवर मेहरबान, इतरांची थेट सुरक्षा काढली
एकीकडे शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी दोन नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे सरकारवर निशाणा साधला जातोय. काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्पदेखील गुजरातला स्थलांतरीत करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. या सगळ्या घडामोडींदरम्यान शिंदे सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे सरकारने महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांची सुरक्षा काढली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता शिंदे सरकारने वरुण सरदेसाई यांची देखील सुरक्षा काढली आहे. तसेच राज्य सरकारने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीदेखील सुरक्षा कमी केली आहे. या माध्यमातून शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा झटका दिल्याचं मानलं जात आहे.
एकीकडे शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी दोन नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शिंदे सरकारने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना आधी x प्लस दर्जाची सुरक्षा होती. पण आता त्यांना y प्लस दर्जाची सुरक्षा आणि एक्सकॉर्ट देण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे.
शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील जवळीक वाढली आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना पक्षाचे सचिव. त्यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या गटात वळवलं तर राज्याच्या राजकारणात आणखी वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं. शिंदे गटाला कदाचित त्याचा फायदाच होऊ शकतो.