‘संभाजी भिडे यांचं नाव याचिकेतून काढा’, मुंबई हायकोर्ट असं का म्हणालं?
संभाजी भिडे यांच्याविरोधात वातावरण तापलेलं असताना मुंबई हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना कोर्टाने याचिकाकर्त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना एकप्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण महात्मा गांधी यांच्या विरोधात भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून प्रतिवादी क्रमांक 5 म्हणजे संभाजी भिडे यांचं नाव याचिकेतून काढा, नाहीतर त्याबाबत आम्ही निर्णय देऊ, असं कोर्टाने सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांना सांगितलंय. महात्मा गांधींबाबतचं बदनामीकारक वक्तव्य प्रकरणात महनीय व्यक्तींची विटंबना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश द्या, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींसह देशासाठी महनीय असलेल्या अन्य व्यक्तींबाबत केल्या जाणाऱ्या अपमानास्पद किंवा बदनामीकारक वक्तव्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे.
महनीय व्यक्तींबाबत प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांचा अनियंत्रित प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. यावर याचिकाकर्ते यांचे वकील किरण कदम म्हणाले की, कोर्टाचं म्हणणं होतं की फक्त भिडेंचं नाव का? म्हणून त्यांचं नाव वगळण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर कुमार सप्तर्षी यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका नुकतीच सादर करण्यात आली असून त्यावर आज सुनावणी झाली.
कोर्ट काय म्हणाले ?
आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने याचिकाकर्त्यांना सवाल केला की, अशी अनेक प्रकरण असताना केवळ प्रतिवादी क्रमांक 5 म्हणजे संभाजी भिडे यांच्याविरोधातच याचिका का? त्याचबरोबर कोर्टाने हे देखील सांगितलं की, जनहित याचिका केवळ एका व्यक्तीविरोधात होऊ शकत नाही. म्हणून प्रतिवादी क्रमांक 5 नाव (संभाजी भिडेंचं) याचिकेतून वगळणार का? असा थेट सवाल हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला.
प्रतिवादी क्रमांक 5 (संभाजी भिडेंचं) नाव याचिकेतून वगळण्याचे आदेश आम्ही देत आहोत, अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी याचिकाकर्त्यांना सुनावणी दरम्यान केली. मात्र याचिकाकर्ते भिडेंचं नाव कायम ठेवण्यावर ठाम होते.
हायकोर्टांने योग्य ते निर्देश द्यावेत. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. याचिकर्त्यांतर्फे जेष्ठ वकील अनंत अंतुरकर यांनी युक्तिवाद केला. मात्र कुठेतरी हे प्रकार थांबायला हवेत, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं.
याबाबत न्यायालय आपला निर्णय लवकरच देणार आहे. पुढे कोर्टाने राज्य सरकारला सवाल केला की, अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्यांना कसं रोखणार? त्यावर राज्य सरकार अशा घटनांना कधीही खतपाणी घालणार नाही, आम्ही आमच्यापरीनं कायदेशीर उपाय करत आहोत, अशी माहिती राज्य महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी दिली.