BMC : निवडणुकीच्या तोंडावर बीएमसीत 24 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप, लोकायुक्ताकडे तक्रार
मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधित पुनर्वसन व्यक्तींसाठी विविध ठिकाणी मंजूर केलेल्या प्रकल्पांतील टीडीआर, प्रीमियम, क्रेडिट नोटच्या अनुषंगाने संबंधित विकासकांना सुमारे 8 ते 9हजार कोटी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आलाय.
मुंबई : काही दिवसातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) लागत आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडवार पालिकेत विरोधी पक्षात असणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसकडून (Congress) घोटाळ्याचे आरोप झाल्याने खळबळ माजली आहे. मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करणारा टिडीआर घोटाळा तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा 24 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने केले आहेत. टीडीआर (TDR Fraud) घोटाळ्यासंदर्भात मुंबई काँग्रेसने लोकायुक्त, महापालिका आयुक्त – प्रशासक, केंद्रीय दक्षता समिती यांना पत्र दिले आहे, अशी माहिती पोलिकेतील काँग्रेस नेते रवी राजा यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधित पुनर्वसन व्यक्तींसाठी विविध ठिकाणी मंजूर केलेल्या प्रकल्पांतील टीडीआर, प्रीमियम, क्रेडिट नोटच्या अनुषंगाने संबंधित विकासकांना सुमारे 8 ते 9हजार कोटी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आलाय.
रवी राजा यांचे आरोप नेमके काय?
तर मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत 9380 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेने वरळी जी साऊथ, मुलुंड टी वॉर्ड, भांडुप एस वॉर्ड, चांदीवली एल वॉर्ड या ठिकाणी 14500 प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधायचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यासाठी रेडी रेकनर नुसार 3200 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र पालिकेने विकासकांना फायदा पोहचवण्यासाठी 12 हजार कोटीहून अधिकचे प्रस्ताव मंजूर केले आहे. असा आरोप करण्यात आलाय.
रवी राजा यांचा इशारा
तर यामधून प्रीमियम क्रेडीट नोट, भूखंड टीडीआर, बांधकाम टीडीआर यामधून विकासकांना 9380 कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. प्रकल्पबाधीतांच्या घराच्या बांधकामात घोटाळा झाल्याने त्याची तक्रार लोकायुक्त, पालिका आयुक्त तसेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यांना करण्यात आली आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.
कुठे किती पैसा गेल्याचा दावा?
- भांडुप पश्चिम येथे न्यू वर्ल्ड लँडमार्क एलएलपी विकासकाम 1 हजार 56 कोटी 75 लाख रु. इतका फायदा झाल्याचा दावा. याठिकाणी 1,903 घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी विकासकास 39 हजार चौरस फूट दराने विकासकास रक्कम आणि टीडीआर, क्रेडिट नोट देण्यात येणार आहे.
- मुलुंड पूर्व येथे स्वास कन्स्ट्रक्शनला तिथल्या योजनेतील 4114 कोटी रु.चा,. फायदा होणार असल्याचा आरोप — या प्रकल्पात 7439 घरे बनविण्याची योजना असून त्यासाठी प्रत्येक घरामागे विकासकास प्रति चौरस फूट 38 हजार रु. देण्यात येतील. त्याबरोबर टीडीआर, क्रेडिट नोटही दिले जातील.
- चांदिवली येथे नगर भूमापन क्र. 11 ए/5 येथे विकासकास 2123 कोटी 81 कोटी रु.चा फायदा होणार असल्याचा आरोप.
- माहीम येथील भूखंड क्रमांक 1074 नगर रचना योजना 4 येथे क्लासिक प्रमोटर्स अँड बिल्डर प्रा. तर्फे प्रकल्पबाधित पुनर्वसन योजनेत 529 घरे असून त्यांचे क्षेत्रफळ हे 3317 चौरस मीटर आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरांची किमंत आणि क्रेडिट नोट, टीडीआर, जमिनीची किंमत आदी सर्व हिशोब केल्यास तिथे विकासकास 680 कोटी 91 लाख रु.चा लाभ होणार असल्याचा आरोप केला आहे.
- वरळी येथे 529 घरे बांधण्यासाठी क्लासिक प्रमोटर अँड बिल्डरला 617 कोटी 88 लाख रु. दिले जातील. तसेच, चांदिवलीतील प्रकल्पासाठी डीबी रिऍलिटीस 4 हजार घरे बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी प्रति चौरस फूट 35 हजार रु. रक्कम, टीडीआर, क्रेडिट नोट देण्यात येणार आहे, असे दावे काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.