Maharashtra Drought Situation | महाराष्ट्र मोठ्या संकटाच्या सावटाखाली, मराठवाड्यात भीषण अवस्था, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
महाराष्ट्रात यावर्षी काही भागांमध्ये प्रचंड कमी पाऊस पडला आहे. विशेषत: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस खूप कमी पडलाय. त्यामुळे मराठवाड्यातील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मराठवाड्यात कोणत्या धरणात नेमका किती पाणीसाठा आहे? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद | 28 ऑगस्ट 2023 : राज्यात कोकण वगळता पर्जन्यमानात मोठी तूट बघायला मिळत आहे. राज्यभरात कोकण वगळता पाणीटंचाईची मोठी समस्या उद्भवली आहे. अनेक भागात खरीपाची शेती संकटात सापडली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत पडले आहेत. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे अनेक ठिकाणी पीकं करपली आहेत. परिणामी राज्यावर दुष्काळाचं सावट ओढवल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात 1 जून ते 26 ऑगस्टदरम्यान 709.5 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 8 मिमी कमी पाऊस पडला आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पावसाची नोंद झालीय. तर अहमदनगर जिलह्यात 34 टक्के, धुळे जिल्ह्यात 23 टक्के, जळगावात 14 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोल्हापुरात 14 टक्के, नंदुरबारमध्ये 21 टक्के, नाशिक जिल्ह्यात 9 टक्के, पुण्यात 17 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीत 45 टक्के, साताऱ्यात 36 टक्के, सोलापुरात 27 टक्के कमी पावसाची नोंद झालीय.
मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट
विशेष म्हणजे मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी घट झालीय. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. पिण्याचं पाणीच कमी असल्यामुळे आता पिकांच्या सिंचनासाठीदेखील पाणी वापरावर बंधनं आली आहेत.
औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारं धरण घटलं
औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक धरणांमधील पाणी पातळी ही कमालीची घटलेली आहे. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यापासून ते पिण्याच्या पाण्यात मोठी तूट मराठवाड्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हरसूल धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झालीय. हरसूल धरणाची पाणी पातळी गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात 28 फुटांपर्यंत आली होती. पण यावर्षी सध्याच्या घडीला हरसूल धरणातील पाणी पातळी ही केवळ 5 ते 6 फूटपर्यंत आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर परिस्थिती अतिशय भीषण होऊ शकते.
मराठवाड्यातील दोन धरणांमध्ये शून्य पाणीसाठा
मराठवाड्यात दुष्काळाचं मोठं संकट ओढावू शकतं. मराठवाड्यात धरणाच्या पाणीपातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांमधील आणि 8 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण धरणांमधील पाणी साठा घटत चालला आहे. विशेष म्हणजे निम्न तेरणा आणि सीना कोळगाव धरणात 0 (शून्य) टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
मराठवाड्याततील 11 महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा
- 1) जायकवाडी 25 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 74 टीएमसी पाणी ( 1 टीमसी पाणी म्हणजे 100 एकर ऊसाच्या शेतीला जितकं पाणी लागतं तितकं पाणी
- 2) निम्न दुधना 2 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 5 टीमसी पाणी
- 3) येलदरीटीमसी पाणी. मागच्या वर्षी25 टीमसी पाणी
- 4) सिद्धेश्वर 1 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 2 टीमसी पाणी
- 5) माजलगाव 1 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 6 टीमसी पाणी
- 6) मांजरा 1 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 2 टीमसी पाणी
- 7) पैनगंगा 22 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 32 टीमसी पाणी
- 8) मानार 2 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 4 टीमसी पाणी
- 9) निम्न तेरणा 0 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 3 टीमसी पाणी
- 10) विष्णुपुरी 2 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 2 टीमसी पाणी
- 11) सीना कोळेगव 0 टीमसी पाणी. मागच्या वर्षी 0 टीमसी पाणी.