Ajit Pawar | अजितदादांवरुन महायुतीत धुसफूस वाढली, शिंदे गटाचे आमदार मोठी मागणी करण्याच्या तयारीत
Ajit Pawar | ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ हा प्रश्न जिव्हारी लागला. शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली.
मुंबई : मागच्या आठवड्यात ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या एकाच रुग्णालयात जवळपास 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच मुद्यावरुन मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजितदादांनी विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. वादाची ठिणगी पडल्याचं लक्षात येताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन हा विषय थांबल्याच सूत्रांनी सांगितलं.
आता याच मुद्यावरुन शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता
‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला होता. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही. अजित पावर सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे.
ते फारस रुचलेलं नाही
शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. अजित पवार यांनी थेट सवाल केल्याने शिंदे यांना ते फारसे रुचले नसल्याची चर्चा शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आहे. भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल?
अशा वेळी भाजपनेते आणि विशेषत: फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे. अजित पवार यांना भाजपबरोबर घेण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळेच शिंदे आणि पवार यांच्यात आणखी कटुता निर्माण झाल्यास भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.