नरेंद्र मोदी हे पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त!; काँग्रेसचा जोरदार शाब्दिक हल्ला
Nana Patole on PM Narendra Modi : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया तुम्हाला चालतं, पण भारताचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का?; काँग्रेसचा थेट सवाल
जालना | 07 ऑगस्ट 2023 : नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त आहेत. प्रधानमंत्री कमी पण स्वत:च्या पक्षाची भाजपाची काळजी घेणारे इतिहासातील पहिले प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया हे तुम्हाला चालतं. परंतु भारताचं नाव घ्यायला तुम्हाला लाज का वाटते?, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
भारताच्या स्वतंत्र लढ्यात ज्यांचं योगदान नाही. कधी तिरंगा फडकवला नाही. अशा आरएसएसच्या कुशीतून जन्मलेलं भाजपला भारताचं आणि इंडियाचं नाव घेतल्यावर एवढं का दुखत आहे?, असा सवाल पटोलेंनी विचारला आहे.
इंडिया विरुद्ध एनडीए याचाच सध्या भाजपला सगळ्यात जास्त त्रास होत आहे. हे जे बोलणारे लोक आहेत. त्यांनी नेहमी भारताचा आणि इंडियाचा राग केलेला आहे. त्यामुळे हा त्रास होत आहे, असं नान पटोले म्हणाले आहेत.
2014 मध्ये नरेंद्र मोदी काँग्रेस मुक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आज त्याच काँग्रेसला नरेंद्र मोदी घाबरतात. राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून कारवाई करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं ते घाबरून करतात, असाही घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
इंग्रजांच्या विरोधातही गांधी जिंकले होते आणि आता भाजपच्या तानाशाहीच्या विरोधातही गांधी जिंकले आहेत. नरेंद्र मोदी हे नेहमीच राहुल गांधींना घाबरतात. याच पद्धतीचं चित्र सध्या पुढं आलं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
राहुल गांधी लोकसभेत येऊ नये. म्हणून खोटे आरोप करून खालच्या कोर्टात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्याचं पाप करण्याच काम केंद्राच्या सरकारच्या दबावामुळे झालं होतं. मात्र या सगळ्याला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. त्यामुळे विजय सत्याचाच होतो. हे आता स्पष्ट झालं आहे. सत्यमेव जयते, असं नाना पटोले म्हणालेत.
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसकडून त्याचं स्वागत केलं जात आहे. माजी महसूलमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी पुन्हा खासदार म्हणून लोकसभेत जाताय त्यांचं अभिनंदन… ज्या पद्धतीने त्यांची खासदारकी काढली गेली त्याची देशाच्या इतिहासात नोंद काळ्या अक्षराने केली जाईल. राहुल गांधी यांच्याबाबत केलेली कृती लाजीरवाणी आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांवा न्याय दिला आहे. राहुल गांधी यांची भाजप सरकारला भीती वाटतेय, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.