औरंगाबाद लोकसभेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये ठिणगी; संजय शिरसाट यांनी थेट भाजपच्या केंद्रीय मंत्र्यालाच सुनावले
विनायक राऊत काही विधाने करतात. त्यांनी आपली लायकी आणि पोच पाहिली पाहिजे. माणसाने लायकी पाहून विधानं करावी, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
औरंगाबाद | 21 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुका जसजशा येत आहेत, तसतसा आघाडी आणि महायुतीमधील जागांवरील दावेप्रतिदावे समोर येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कराड यांच्या या इच्छेला शिंदे गटाने केराची टोपली दाखवली आहे. दिल्लीत गेल्यानंतर भागवत कराड यांच्यावर परिणाम झाला आहे. औरंगाबाद ही शिवसेनेची जागा असून शिवसेनाच लढेल. भागवत कराड लढणार म्हणून ही जागा सुटणार नाही,. कराड यांनी शांत राहावे. घाई करू नये, असा सल्लाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादवरून महायुतीत चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील मृत्यूवरून सवाल केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला असेल तर यात काहीही गैर नाही. या मुद्द्याला विनाकारण वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांनी या प्रश्नातले गांभीर्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मुद्दा काढला तो चांगला काढला. त्याबद्दल वाईट वाटण्यासारखे काही नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
राऊत लढणार ही आनंदाची बातमी
शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत येडा आहे. सकाळी भुंकण्यासाठी काहीही मुद्दे घेत असतात. राऊत निवडणूक लढवणार ही आमच्यासाठी आनंदाची बतमी आहे. एकदा यांना यांची औकात कळू द्या. संजय राउतचे डिपॉझिट जाऊ नये म्हणजे झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
तेव्हा मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला सोडून दिलं
शरद पवार उत्तुंग व्यक्तीमत्त्व असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असं विधान राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. वळसे पाटील यांच्या या विधानाचं शिरसाट यांनी समर्थन केलं. दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य योग्य आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही झाला नाही. जेव्हा होण्याची वेळ आली तेव्हा दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद सोडून दिलं, असा टोला त्यांनी लगावला.
चिंतन, मनन करा
शरद पवार यांची महाराष्ट्रात ताकत असली तरी त्यांची स्वबळावर सत्ता आली नाही हे तितकेच सत्य आहे. ते कुठे कमी पडले की काय याचं त्यांनी चिंतन, मनन केलं पाहिजे. इतकं वर्ष राज्यात राजकारण करूनही सत्ता का आली नाही हे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.