औरंगाबाद लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी, एका एका पक्षात दोन दोन दावेदार; कुणाकुणाला व्हायचंय खासदार?
लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. असं असतानाच आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी तर 11 जण इच्छुक आहेत. त्यापैकी पाचजण तर एकट्या भाजपमधीलच आहेत.
औरंगाबाद | 19 ऑगस्ट 2023 : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. कोणत्या मतदारसंघात किती ताकद आहे? प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती काय आहे? कोण इच्छुक आहे? प्रत्येक मतदारसंघात किती मतदार आहेत? त्यात पुरुष, स्त्रिया आणि तरुणांची संख्या किती आहे याची माहिती घेतली जात आहे. या माहितीनुसार आराखडे आखले जात आहेत. तर, दुसरीकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी आहे. या मतदारसंघातील इच्छुकांची नावे समोर आली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी एकाच पक्षातून दोन ते चार इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला तिकीट द्यायचं यावरून सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद लोकसभेसाठी ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस आणि भाजपमधील इच्छुकांची नावे समोर आली आहे. एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी मिळणार आहेत. औरंगाबाद लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दोन नेते इच्छुक आहेत. शिंदे गटाकडूनही दोन नेते इच्छुक असून दोघेही शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. काँग्रेसमधूनही दोन नेते इच्छुक आहेत. सर्वाधिक चुरस मात्र भाजपमध्ये दिसत आहे. भाजपमधून औरंगाबाद लोकसभेसाठी पाच जण इच्छुक आहेत. त्यातील एकजण शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे. तर दुसरा मोदी सरकारमध्ये मंत्री आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खैरेंना आव्हान दानवेंचं?
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. चंद्रकांत खैरे हे या मतदारसंघातील माजी खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला सोडला जावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे मातोश्री कुणावर मेहेर नजर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्तार की भुमरे? शिंदेंसमोर पेच
शिंदे गटातून या मतदारसंघासाठी दोन नेते इच्छुक आहेत. ते म्हणजे संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार. हे दोन्ही नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. शिवाय दोन्ही नेत्यांचा औरंगाबादमध्ये मोठा दबदबा आहे. त्यामुळे भुमरे की सत्तार? कुणाच्या गळ्यात तिकीटाची माळ टाकायची हा पेच शिंदे यांच्यासमोर उभा राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसमध्ये दोघे इच्छुक
काँग्रेसमधून सुभाष झंबड आणि कल्याण काळे हे दोन्ही नेते औरंगाबाद लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यास काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना विधानसभेची तयारी करावी लागणार असल्याचं चित्र आहे.
कराड, सावे आणि रहाटकर
भाजपमधून लोकसभेसाठी पाच जण इच्छुक आहेत. अतुल सावे, संजय किणीकर, विजया रहाटकर, प्रशांत बंब आणि भागवत कराड हे पाचजण निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. भागवत कराड हे केंद्रात तर अतुल सावे हे राज्यात मंत्री आहेत. मात्र, पाचही नेत्यांचं औरंगाबादमध्ये महत्त्वाचं स्थान असल्याने भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबाद कुणाचे?
राज्यात दोन महत्त्वाच्या आघाड्या आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश आहे. तर ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची युती आहे. तर, महायुतीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट आहे. महायुतीत ही जागा पूर्वी शिवसेनेकडे असायची. चंद्रकांत खैरे या मतदारसंघातून निवडून यायचे. खैरे हे ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे भाजप ही जागा शिंदे गटाला सोडणार की स्वत: लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तर औरंगाबादमधून ठाकरे गटाचा उमेदवार सातत्याने निवडून येत असल्याने महाविकास आघाडीत ठाकरे गट औरंगाबादवर दावा करेल. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ही जागा सुटली तरी वंचित आघाडीकडून औरंगाबादच्या जागेचा आग्रह धरला जाऊ शकतो. कारण सध्या औरंगाबादमध्ये वंचित आणि एमआयएम युतीचा खासदार आहे. त्यामुळे वंचितही ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे ही जागा कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.