Aurangabad | आता शहरातल्या नव्या हौसिंग संस्थांना चार्जिंग स्टेशन बंधनकारक, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय
आता नव्याने उभ्या राहणाऱ्या हौसिंग सोसायटींमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बंधनकारक असेल, अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. बांधकाम परवानगी देताना दोन दिवसात यासंदर्भातील कारवाई पूर्ण केली जाईल, असे नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी सांगितले.
औरंगाबादः प्रदूषण मुक्त औरंगाबादचे (Aurangabad city) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारी पातळीवरून ई व्हेइकलसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र अशा वाहनांची संख्या वाढली तरीही ती चार्ज करण्याची सुविधा सध्या शहरात अपुरी आहे. त्यामुळेच आता शहरात चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय महापालिकेने (Aurangabad municipal corporation) घेतला आहे. शहरात येत्या काही दिवसात जवळपास 200 चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी आता गृहनिर्माण संस्थांना बांधकाम परवानगी देताना चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आता यापुढे ज्या काही नव्या हौसिंग सोसायट्या उभ्या राहणार आहेत, तिथे इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सोय केली जाईल.
इलेक्ट्रिक वाहनांवर स्मार्ट सिटीचा भर
पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचा वापर कमी करून इलेक्ट्रिक आणि सौर ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका, स्मार्ट सिटीसाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, स्मार्ट सिटीसाठी पाच कार खरेदी केल्यानंतर आता मनपा पदाधिकाऱ्यांसाठीही इलेक्ट्रिक कार खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच नागरिकांचाही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
हौसिंग सोसायट्यांत चार्जिंग स्टेशन
शहरात कोणताही गृहप्रकल्प किंवा हौसिंग सोसायटी बांधायची असल्यास बांधकाम व्यावसायिकांना मनपा नगररचना विभागाकडून परवानही घ्यावी लागत असते. त्यामुळे आता नव्याने उभ्या राहणाऱ्या हौसिंग सोसायटींमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बंधनकारक असेल, अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. बांधकाम परवानगी देताना दोन दिवसात यासंदर्भातील कारवाई पूर्ण केली जाईल, असे नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी सांगितले.
इतर बातम्या-