तलाठीच्या परीक्षेत सर्व्हर डाऊन; विद्यार्थी आक्रमक, म्हणाले, प्रश्न आमच्या भवितव्याचा!
Talathi Exam Server Down : तलाठीच्या परीक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन; शेकडो विद्यार्थी खोळंबले. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं आहे. वाचा संपूर्ण बातमी...
अमरावती | 21 ऑगस्ट 2023 : प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती आहे.
अमरावतीतही तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. अमरावती शहरातील अनेक ऑनलाईन सेंटरवर ही परीक्षा होत आहे. विद्यार्थी सकाळी साडेसात वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर हजर आहेत. मात्र नऊ वाजता परिक्षा सुरू होणार असताना आता 10 वाजून गेले तरी परिक्षा सुरू होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मात्र आक्रमक झालेत.
लातूरमध्येही तलाठी पदासाठीची परीक्षा खोळंबली आहे.सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षेसाठी आलेले उमेदवार केंद्राबाहेर थांबून आहेत. 150 च्या आसपास परीक्षार्थी सध्या परिक्षा केंद्राबाहेर आहेत. सकाळी 9 वाजता ही परिक्षा होणार होती. मात्र नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत.
तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं आहे. औरंगाबाद शहरातील पीएस महाविद्यालयांमध्ये तलाठी भरती परीक्षा आज पासून सुरू झालेली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकलं नाही. परिणामी तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागलं आहे. तब्बल पाऊण तासानंतर सर्वर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला आहे.
विद्यार्थी आक्रमक
परिक्षेसाठी वेळेच्या आधी पोहोचूनही केवळ सर्व्हर डाऊन असल्यामुळे परिक्षेला बसता आलं नाही. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आम्ही परिक्षेसाठी तयारी केली. मेहनत घेतली. मात्र आता केवळ सर्व्हर डाऊन असल्यामुळे परिक्षा देता येत नाही. याकडे गांभिर्याने पाहणं गरजेचं आहे. लवकरात लवकर आमची परिक्षा घ्या, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
नाशिकमधील तलाठी पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी गणेश गुसिंगे हा मास्टरमाईंड आरोपी असल्याचं दोन दिवसाआधी पोलीस तपासात निष्पन्न झालं. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या म्हाडा भरती आणि 2021 मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचे आढळून आलं आहे. त्याच्याविरोधात खेरवाडी, पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात याअगोदर गुन्हा दाखल आहे. मात्र गुन्हा दाखल असूनही गुसिंगे हा दोन वर्षांपासून फरार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.