Golden Sparrow | भारत पुन्हा सोने की चिडिया, यंदा 20 हजार किलो सोन्यासाठी होणार खोदाखोदी; प्रकरण काय?
केंद्रीय खनिजकर्म उद्योगाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतातील सोन्याच्या खाणीत एकूण 70.1 टन सोने आहे. यातील 88 टक्के सोने हे एकट्या कर्नाटकात आहे. आंध्र प्रदेशात 12 टक्के आणि झारखंडमध्ये 0.1 टक्के सोने आहे.
नवी दिल्लीः कधी काळी भारतातून सोन्याचा धूर निघायचा, असे म्हटले जायचे. आता याच अतिशय लोकप्रिय असणाऱ्या आणि अनेकांच्या गळ्यातले ताईत झालेल्या सोन्याच्या (Gold) उत्खननात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने (India) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षी तब्बल 20 हजार किलो सोने खोदून काढण्यात येणार आहे. केंद्रीय खनिजकर्म उद्योगाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतातील सोन्याच्या खाणीत एकूण 70.1 टन सोने आहे. यातील 88 टक्के सोने हे एकट्या कर्नाटकात (Karnataka) आहे. आंध्र प्रदेशात 12 टक्के आणि झारखंडमध्ये 0.1 टक्के सोने आहे. देशात पहिल्यांदा सोन्याचे उत्खनन कर्नाटकमध्ये 1947 साली झाले. तेव्हा हट्टी गोल्ड माइनमधून सोने काढण्यात आले. या खाणीतून आतापर्यंत तब्बल 84 टन सोने काढण्यात आले आहे. जगात सर्वात जास्त सोने खरेदी भारत आणि चीनमध्ये केली जाते. एकूण जागतिक सोन्याच्या खरेदीपैकी या दोन देशात 57 टक्के खरेदी होते. तर गेल्या वर्षी भारतात तब्बल अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची खरेदी झाली. एखाद्या जागी सोन्याचा शोध लागला म्हणजे लगेच ते बाजारात येते असे नाही. त्यावर प्रक्रिया केली जाते. सोने शुद्ध करून ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते.
कसे होते सोन्याचे उत्खनन?
सोने सापडले की त्या जागेचे संपादन केले जाते. यंत्राच्या सहाय्याने तिथे खोदकाम होते. जमिनीच्या खोलवर किमान साडेतीन किलोमीटरपर्यंत खोदाखोद करावी लागते. तेव्हा कुठे सोने असलेले खडक सापडतात. हे खडक फोडले जातातत. ते जमिनीतून वर काढतात. हे खडक जवळच्या प्रकल्पात नेऊन त्यांचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यातून सोने वेगळे केले जाते. ही खूप वेळखावू आणि अतिशय किचकट अशी प्रक्रिया असते.
कशी वाढते किंमत?
सोने असलेले खडक सायनाइड, कार्बनच्या मिश्रणात भिजवून ठेवतात. त्यात खडक विरघळतो आणि कच्चे सोने दृष्टीस पडते. हे सोने उच्च तापमानात वितळवतात. यातून कार्बन निघून जाते. मग शुद्ध सोने दिसते. सोन्याची शुद्धता ही या प्रक्रियेवरच ठरते. या सोन्याचे बारीक कण उत्पादन प्रकल्पात पाठवतात. त्याची बिस्कीटे, चीप, वीट अशी गरजेनुसार निर्मिती केली जाते. एकंदर सोन्याचे साठे सापडण्यापासून ते हाती येईपर्यंत बराच काळ जावा लागतो. त्यामुळे आपसुकच त्याची किंमतही वाढते.
इतर बातम्याः