Luna-25 Crash | रशियाच्या मिशनमध्ये यशाची शक्यता किती टक्के होती? स्पेस एजन्सीच्या चीफने पुतिन यांना काय सांगितलेलं?
Luna-25 Crash | मिशन सुरु होण्याआधीच रशियन स्पेस एजन्सीच्या प्रमुखाने पुतिन यांना काय कल्पना दिलेली? रशियाकडे शक्तीशाली रॉकेट असल्याने पाच दिवसातच लूना-25 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.
मॉस्को : रशियाला शनिवारी मोठा झटका बसला. अवकाश संशोधन क्षेत्रातील रशियाच्या वर्चस्वाला हा धक्का मानला जात आहे. तब्बल 50 वर्षानंतर रशियाने पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याच स्वप्न पाहिलं होतं. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. 1976 नंतर रशियाने पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवलं होतं. शीत युद्धाच्या काळात अन्य क्षेत्रांबरोबर अवकाश संशोधनातही अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र स्पर्धा होती. चंद्रावर पहिलं कोण पोहोचणार? यासाठी दोन्ही देशांमध्ये चुरस होती.
त्यावेळी रशियाने यशस्वी चांद्र मोहिमेने बाजी मारली होती. पण अमेरिकेने चंद्रावर पहिलं मनवी पाऊल ठेवलं. त्याच रशियाची लूना-25 ही चांद्र मोहिम शनिवारी फसली. रशियाच्या फार इस्ट भागातील अवकाश तळावरुन 11 ऑगस्टला लूना-25 चंद्रावर झेपावलं होतं.
पाच दिवसात चंद्राच्या कक्षेत
रशियाकडे शक्तीशाली रॉकेट असल्याने पाच दिवसातच लूना-25 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. भारताच्या चांद्रयान-3 आधी आज 21 ऑगस्टला लूना-25 चांद्रभूमीवर उतरणार होते. पण त्याआधीच शनिवारी दुपारी 2.57 मिनिटांनी रॉसकॉसमॉसचा लूना-25 बरोबर संपर्क तुटला. पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले. पण त्यात यश मिळालं नाही. अखेर रविवारी रशियाने चांद्र मोहिम अयशस्वी ठरल्याच जाहीर केलं.
मक्तेदारीला हा एक धक्का
खरंतर भारताच्या तुलनेत रशियाकडे चंद्रावर यान उतरवण्याचा दांडगा अनुभव आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा रशिया जगातील पहिला देश आहे. त्यामुळे रशियासाठी हे फार कठीण नाही, असं अनेकांना वाटत होतं. पण अखेरीस त्यांचं मिशन फसलं. रशियाच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील मक्तेदारीला हा एक धक्का मानला जात आहे.
रॉसकॉसमॉस प्रमुखांनी पुतिन यांना काय सांगितलेलं?
जून महिन्यात रॉसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरीसोव्ह यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. त्यांना सांगितलं होतं की, “असे मिशन्स धोकादायक असतात. या मिशनमध्ये यश मिळण्याची शक्यता 70 टक्के असते” रशिया अवकाश संशोधनात का मागे पडला?
रशियाची लूना-25 मोहीम वर्षभरासाठी होती. त्यांचं यान वर्षभर चंद्रावर कार्यरत राहणार होतं. चांद्रभूमीवरील नमुने गोळा करुन मातीच विश्लेषण करण्यात येणार होतं. या मिशनसाठी रशियाला युरोपियन देशांकडू मदत मिळणार होती. पण युक्रेन युद्धामुळे ही मदत नाकारण्यात आली. युरोपियन स्पेस एजन्सीने मदत केली, नाही तरी आम्ही आमचे मिशन्स पूर्ण करु अशी रशियाची भूमिका आहे. रशियाने मागच्या काही वर्षात अवकाश संशोधनाऐवजी मिसाइल, फायटर विमानं या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर जास्त लक्ष दिलं. परिणामी त्यांचं स्पेस कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झालं.