वारंवार येणाऱ्या शिंकांनी त्रासलात ? या घरगुती उपायांनी मिळेल लगेच आराम
Natural Remedy For Continuous Sneezing : काही लोकांना सतत शिंका येण्याचा त्रास होत असतो. शिंकांमुळे ते अगदी हैराण होऊन जातात. हा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
Home Remedies For Sneezing : बऱ्याच वेळा धूळ, मातीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा ॲलर्जीमुळे आपल्याला शिंक (sneezing) येऊ शकते. आपले नाक बॅक्टेरियाला (bacteria) शिंकेमार्फत बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे सतत शिंका येऊ शकतात. सर्दी, धूळ, माती, ॲलर्जी किंवा नाकात काही तिखट गेल्यामुळेही वारंवार शिंका येऊ शकतात. अशा वेळी काही घरगुती उपायांचा वापर केला तर त्या या समस्येपासून लवकर आराम मिळू शकतो. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.
गरम पाण्याची वाफ घेणे
हवामानातील बदलामुळे जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर त्यामुळेही तुम्हाला वारंवार शिंका येऊ शकतात. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत मानली जाते, ज्यामुळे शिंका येणे थांबवण्यास मदत होते. डोक्यावर टॉवेल ओढून चेहऱ्यावर गरम पाण्याने वाफ घ्या. हा उपाय नियमित केल्यास फायदा होऊ शकतो.
हळदीचे दूध
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. तसेच खोकला आणि सर्दीचा त्रास बरा करण्यासाठी आपली आई किंवा आजीदेखील हा उपाय करत असत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे वारंवार शिंका येण्याची समस्या टाळता येते. हळदीचे दूध तुम्हाला संसर्गापासून लवकर आराम मिळवून देऊ शकते. याशिवाय तुम्ही आल्याचा चहाही घेऊ शकता.
मध आणि आल्याचे सेवन
वारंवार शिंका येत असतील तर आलं आणि मधाचे सेवन करणे हे देखील उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुम्ही गरम पाण्यात आलं किसून त्यात मध घालून ते पिऊ शकता. आलं व मध या दोन्हींमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स तर असतातच पण त्यासह अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही असतात. जे इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन-सी समृद्ध पदार्थ
जर तुम्हाला वारंवार शिंक येण्याची समस्या असेल तर त्याचे कारण तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी देखील असू शकते. त्यामुळे तुमच्या आहारात व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. यामुळे सर्दी, शिंकण्याची समस्या आणि ॲलर्जीपासूनही लवकर आराम मिळू शकतो. यासाठी तुम्ही लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन सुरू करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)