Kacha Badam | ‘काचा बदाम’ फेम गायकाची परिस्थिती बिकट, कमाई झाली बंद, फसवणुकीबाबत सांगताना कोसळलं रडू
भुबन बादायकर हे पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते शेंगदाणे विकताना 'काचा बदाम' हे गाणं गायचे. याच गाण्यामुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले होते.
कोलकाता : ‘काचा बादाम’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं. हे गाणं गाऊन रातोरात स्टार झालेले भुबन बादायकर तुम्हाला लक्षात आहेत का? शेंगदाणे विकत ‘काचा बादाम’ गाणाऱ्या भुबन यांना एका व्हिडीओने स्टार बनवलं होतं. काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होती की, आता त्यांच्याकडे शेंगदाणे विकण्यासाठीही वेळ नाही. मात्र तेच भुबन आता मोठ्या समस्येत अडकले आहेत. ज्या गाण्याने त्यांचं नशीब पालटलं, ज्या गाण्यामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली, तेच गाणं आता भुबन गाऊ शकत नाहीयेत. परिस्थिती आता इतकी वाईट झाली आहे की त्यांना कोणतं कामसुद्धा मिळत नाहीये.
भुबन बादायकर हे 2022 मध्ये तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते फिरत-फिरत शेंगदाणे विकताना आणि ‘काचा बदाम’ हे गाणं गाताना दिसले. हा व्हिडीओ आणि त्यांनी गायलेलं गाणं नेटकऱ्यांना इतकं आवडलं की अवघ्या काही तासांत तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याच व्हिडीओमुळे ते रातोरात स्टार झाले होते. देशातील विविध भागांमधून लोक त्यांची भेट घेऊ लागले आणि त्यांच्यासोबत व्हिडीओ शूट करू लागले होते.
भुबन यांनी विकत घेतली गाडी, गाणीही केली रेकॉर्ड
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की भुबन यांना रेकॉर्डिंगचे ऑफर्स येऊ लागले होते. त्या काळात त्यांनी खूप पैसे कमावले आणि त्यातून स्वत:ची गाडीसुद्धा विकत घेतली.
View this post on Instagram
आता कमाई झाली बंद
भुबन बादायकर यांच्या ‘काचा बदाम’ या गाण्यावरील रिलमुळे बरेच लोक प्रकाशझोतात आले. मात्र आता खुद्द भुबन हे कमाईसाठी वणवण भटकत आहेत. त्यांच्या स्वत:च्या गाण्यावर आता कॉपीराइट्स येऊ लागले आहेत. यामुळे ते वैतागले आहेत. भुबन यांना काम मिळणंही बंद झालं आहे. शोजचे ऑफर्स मिळत नसल्याने त्यांची कमाईसुद्धा बंद झाली आहे. आपली परिस्थिती सांगताना त्यांना या मुलाखतीत रडू कोसळलं.
गोपाल नावाच्या व्यक्तीने केली फसवणूक
भुबन बादायकर यांनी सांगितलं की गोपाल नावाच्या एका व्यक्तीने त्यांना तीन लाख रुपये दिले आणि ‘काचा बदाम’ गाण्याला युट्यूबवर लोकप्रिय करणार असल्याचं सांगितलं. मात्र आता अशी परिस्थिती आहे की भुबन जेव्हा जे गाणं गाऊन युट्यूबवर अपलोड करतात, तेव्हा त्यांना कॉपीराइटची समस्या येते. याविषयी त्यांनी गोपाल नावाच्या व्यक्तीला विचारलं असता त्यांनी कॉपीराइट क्लेम विकत घेतल्याचं सांगितलं.
भुबन यांनी दाखल केली केस
गोपाल नावाच्या त्या व्यक्तीने भुबन यांच्याकडून काही कागदपत्रांवरही स्वाक्षरी घेतली होती. भुबन यांना लिहिता-वाचता येत नसल्याने त्यात नेमकं काय आहे, हे त्यांना समजू शकलं नाही. अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.