Sagar Karande: सागर कारंडेच्या छातीत दुखू लागल्याने नाटकाचा प्रयोग रद्द; आता कशी आहे तब्येत?
सागर कारंडेची तब्येत का बिघडली? फेसबुकवर Live येत दूर केला चाहत्यांचा गैरसमज
मुंबई: ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या नाटकाचा प्रयोग सुरू होण्याच्या काही तास आधी अभिनेता सागर कारंडेच्या छातीत दुखू लागलं होतं. चक्कर आल्यासारखं वाटल्याने सागर आधी डॉक्टरांकडे गेला. तेव्हा काही चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला नाटकाचा प्रयोग न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे नाटक रद्द करण्यात आलं होतं. गेल्या रविवारी ही घटना घडली होती. मात्र त्यानंतर सागरच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या होत्या. सागरला हार्ट अटॅक आला, तो आयसीयूमध्ये दाखल आहे अशाही अफवा पसरवल्या गेल्या. त्यानंतर आता खुद्द सागरने फेसबुकवर लाईव्ह येत चाहत्यांना तब्येतीविषयी पूर्ण माहिती देण्याचा निर्णय घेतला.
नेमकं काय घडलं होतं?
“रविवारी म्हणजे 20 नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या नाटकाचा दुपारी 4 वाजता साहित्य संघला प्रयोग होता. पण अचानक मला छातीत दुखू लागलं होतं आणि चक्कर आल्यासारखं वाटू लागलं होतं. जवळपास साडेबारा-एकच्या सुमारास हे घडलं. मी लगेच हॉस्पीटलला गेलो. लगेच चेक-अप करून तिथून प्रयोगाला जाऊ असं ठरवलं होतं. ईसीजीचा रिपोर्ट नॉर्मल आला. रॅपिड ब्लड टेस्ट पण केली, तेसुद्धा नॉर्मल होतं. पण डॉक्टर म्हणाले की छातीत दुखतंय आणि चक्कर येतेय तर मी तुम्हाला प्रयोग करण्याची परवानगी नाही देऊ शकत. त्यामुळे तो प्रयोग रद्द करण्यात आला,” असं सागरने स्पष्ट केलं.
“सुदैवाने वासूची सासू या नाटकाची टीम तिथे उभी राहिली आणि त्यांनी नाटकाचा प्रयोग केला. त्यामुळे त्या टीमचे खूप आभार. तुम्ही खूप ग्रेट काम केलात. खूप कमी वेळात तुम्ही भट्टी जमवली. माझ्या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांचेही आभार. कारण ते माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. तू आधी तब्येतीची काळजी घे, नाटक पुन्हा होऊ शकतं, असं ते म्हणाले,” अशा शब्दांत सागरने कृतज्ञता व्यक्त केली.
सागरच्या तब्येतीचे अपडेट्स
“त्यानंतर एक दिवस मी रुग्णालयात दाखल होतो. जेवढ्या ब्लड टेस्ट असतात, त्या सगळ्या मी केल्या आहेत. दिवसातून चार वेळा ईसीजी करण्यात आलं होतं. टू डी इको सुद्धा करण्यात आली. सगळ्या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले. तेव्हा डॉक्टरांनी मला माझ्या मागच्या काही दिवसांचं वेळापत्रक विचारलं”, असं त्याने सांगितलं.
“मागचा संपूर्ण आठवडा मी प्रवास करत होतो. रात्री शूटिंग करत होतो, नाटकाचे प्रयोगही करत होतो. सतत गाडीने प्रवास आणि काम करत होतो. त्यादिवशी मी सकाळी काही खाल्लंही नव्हतं, म्हणून ॲसिडीटीचा त्रास झाला. अंग दुखत होतं. ॲसिडीटी खूप वाढल्याने छातीत दुखू लागल्याचं सांगण्यात आलं. कालही पुन्हा काही टेस्ट झाल्या. त्याचेही रिपोर्ट नॉर्मल आले,” असं तो पुढे म्हणाला.
“आता मी तुमच्यासमोर ठणठणीत बोलतोय. अनेकांनी तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की मी बरा आहे. सोशल मीडियावर अशीही अफवा होती की मला हार्ट अटॅक आला. पण असं काहीच नाही,” असं सागरने स्पष्ट केलं.
त्याचसोबत त्याने सोशल मीडियावर कोणतीही अफवा न पसवरण्याची विनंती केली. गावी असलेले आई-वडील, परदेशी असलेला भाऊ यांना सोशल मीडियावरील खोट्या पोस्ट वाचून धक्का बसू शकतो, त्यामुळे संपूर्ण माहिती नसताना अफवा पसरवू नका, अशी विनंती त्याने चाहत्यांना केली.