Vikrant Rona Box Office Collection: ‘विक्रांत रोना’ची तीन दिवसांत 80 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर ‘शमशेरा’ची अवस्था बिकट
कमाईचा हा आकडा रणबीर कपूरचा 'शमशेरा' (Shamshera) आणि अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज'सारख्या बिग बजेट हिंदी चित्रपटांपेक्षा खूपच जास्त आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई सुरू आहे. कन्नड चित्रपट ‘विक्रांत रोना’ने (Vikrant Rona) प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. किच्चा सुदीपची (Kiccha Sudeep) मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर तीन दिवसांत ‘विक्रांत रोना’ने कमाईचा 80 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे हा आकडा रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) आणि अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’सारख्या बिग बजेट हिंदी चित्रपटांपेक्षा खूपच जास्त आहे.
तिसऱ्या दिवशी कमाईचा 25 कोटींचा आकडा पार
चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत रोनाने शनिवारी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 25 कोटी रुपयांची कमाई केली. या तीन दिवसांत जगभरात एकूण कमाई 80-85 कोटी रुपयांपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कमाईचे अंतिम आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्या तुलनेत रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ने नऊ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून जगभरात फक्त 60 कोटींची कमाई केली आहे. तर अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ने जगभरात 80 कोटींची कमाई केली.
टॉप 3 मध्ये ‘विक्रांत रोना’
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते हा चित्रपट चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा सहज पार करू शकेल. ‘विक्रांत रोना’ अवघ्या तीन दिवसांनंतर पहिल्या 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. लवकरच हा चित्रपट टॉप 3 मध्ये प्रवेश करणे अपेक्षित आहे. Top 2 मध्ये KGF चे दोन्ही भाग आहेत. KGF Chapter 2 ने 1233 कोटी आणि KGF Chapter 1 ने 250 कोटी रुपये कमावले आहेत.
चित्रपटाचं बजेट
अनुप भंडारी दिग्दर्शित ‘विकांत रोना’मध्ये निरुप भंडारी, नीता अशोक आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. 95 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा आतापर्यंतचा सर्वात महागडा कन्नड चित्रपट आहे. चित्रपट समीक्षक आणि सेलिब्रिटींनीही या चित्रपटाच्या आशयाचं कौतुक केलं आहे.
एस. एस. राजामौली यांनीही केलं कौतुक
रविवारी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘विक्रांत रोनाच्या यशाबद्दल किच्चा सुदीप यांचं अभिनंदन. अशा कथेत गुंतवणूक करण्यासाठी धैर्य आणि विश्वास लागतो. तुम्ही चांगलं काम केलात आणि त्यासाठी तुम्हाला मोबदला नक्कीच मिळेल. प्री-क्लायमॅक्स, या चित्रपटाची ओपनिंग चांगली होती.’