सुपरस्टारवर एकतर्फी प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; करिअर संपलं, नैराश्यात अडकून नाकारलं लग्न
तिने तिच्या करिअरमध्ये जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. मात्र तरीही ती इंडस्ट्रीतील कमनशिबी अभिनेत्री ठरली.
मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये असे बरेच अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही लग्न केलं नाही. काहींना त्यांच्या मनासारखा जोडीदार भेटला नाही तर काहींना त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची आवश्यकता वाटली नाही. मात्र इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेमाखातर आपलं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं. 70 च्या दशकातील अभिनेत्री सुलक्षणा पंडितने एकतर्फी प्रेमामुळे कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. सुलक्षणाचं हे प्रेम बॉलिवूडमधल्याच एका सुपरस्टारवर होतं. तिने तिच्या करिअरमध्ये जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. मात्र तरीही ती इंडस्ट्रीतील कमनशिबी अभिनेत्री ठरली.
रिपोर्ट्सनुसार, सुलक्षणा पंडित अभिनेते संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र संजीव कपूर यांनी तिच्याशी लग्न केलं नाही. कारण त्यांचं दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेम होतं. ‘उलझन’ या चित्रपटात सुलक्षणा आणि संजीव कपूर यांनी एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती त्यांच्या प्रेमात पडली. तर दुसरीकडे संजीव कपूर हे दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी त्या अभिनेत्रीला दोन वेळा प्रपोजसुद्धा केलं होतं. मात्र तिने संजीव कपूर यांचं प्रपोजल नाकारलं होतं. यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि आयुष्यभर लग्न न करताच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयाचा परिणाम सुलक्षणा यांच्यावरही झाला आणि तिनेसुद्धा कधीच कोणाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
1985 मध्ये संजीव कुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा ते फक्त 47 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सुलक्षणा नैराश्यात गेली आणि तिने लग्न केलंच नाही. सुलक्षणाची बहीण विजेता पंडितने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की संजीव कुमार यांच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली आणि तेव्हापासूनच ती नैराश्याच्या गर्तेत अडकली.
2006 मध्ये विजेता पंडितने सुलक्षणाला तिच्या घरी आणलं. मात्र सुलक्षणाने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. ती कोणाचीच भेट घेत नव्हती किंवा कोणाशीच बोलत नव्हती. एकेदिवशी बाथरुममध्ये पाय घसरून तिच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तिच्यावर चार सर्जरी झाल्या, मात्र त्यामुळे आजही सुलक्षणाला नीट चालता येत नाही.