मुख्यमंत्रिपदाबाबत विचारल्यावर का भडकले विश्वजीत राणे? गोव्याच्या राजकारणात चाललंय काय?
मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता विश्वजीत राणे पत्रकारांवरच भडकले. असले फालतू प्रश्न मला विचारू नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेत्यांना विचारा अशा शब्दांत विश्वजीत राणे यांनी आपली नाराजी पत्रकारांपुढे व्यक्त केली.
गोवा : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Goa Elections result 2022) लागून बरेच दिवस झाले. मात्र गोव्याच्या राजकारणतल्या उलटसुलट चर्चा शांत झाल्या नाहीत. निवडणुकीनंतरही विश्वजीत राणे (Vishwajit rane) विरुद्ध मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) असा संघर्ष सर्वांनी पाहिला. आज तर मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता विश्वजीत राणे पत्रकारांवरच भडकले. असले फालतू प्रश्न मला विचारू नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेत्यांना विचारा अशा शब्दांत विश्वजीत राणे यांनी आपली नाराजी पत्रकारांपुढे व्यक्त केली. त्यामुळे गोव्यात अजूनही काही पूर्ण अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांना अभिवादनासाठी विश्वजीत राणे आले होते. त्यावेळी ते बोलत होते
पर्रीकरांची कमी भासतेय-विश्वजीत राणे
याच प्रश्नावर पुढे बोलताना राणे म्हणाले, मी भाजपात आलो, माझा प्रवास सुरू झाला, मी मंत्री झालो ते मनोहर पर्रीकर यांच्यामुळे. गोव्यात पर्रीकरांनी भाजप बांधली. ते गोवा भाजपतले मोठे नेते होते, मी त्यांच्याबरोबरच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. गोव्यात त्यांची उणीव भासतेय. त्यांच्या प्रशासकीय क्षमता, सरकार चालवण्याच्या पद्धतीची तसंच त्यांचं व्हिजन या सर्वाची उणीव भासतेय. गोव्यातले आताचे रस्ते पाहा, तसेच गोव्यात उभे राहिलेले इन्फ्रास्ट्रुचर पाहा, हे सर्व पर्रीकर यांच्यामुळे झाले. गोव्याला त्यांची उणीव भासतेय, असे म्हणत राणे यांनी भाजपचे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं टेन्शन वाढवलं आहे.
जाहीरातीतून सावंत यांचा फोटो गायब
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचं नाव कालच निश्चित केले आहे. त्यामुळे विश्वजित राणे भाजपवर नाराज आहेत. मुख्यमंत्री पदावरून डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यात निवडणुकीच्या निकालानंतर शीतयुद्ध सुरू होते. विश्वजीत राणे हे डॉ. प्रमोद सावंत यांना आपले नेते मानत नाहीत हे त्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीतून स्पष्ट झाले आहे. त्यांनी दिलेल्या जाहिरातीत सर्व राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांचे फोटो होते. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब होते. त्यामुळेही चांगल्याच राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे पुन्हा गोवा काबीज केलेल्या भाजपचं टेन्शन अजूनही संपलेलं नाहीये.
गोव्यात मुख्यमंत्री सावंतच असणार की आणखी कुणी? दिल्लीत घडामोडींना वेग, फडणवीसही बैठकीसाठी दाखल
tv9 Special : भाजपात जाणार की नाही? उत्त्पल पर्रिकर म्हणतात, हळू हळू सॉर्टआऊट होतील
गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?