Vijay Mallya : मोठी बातमी! विजय माल्याला 4 महिन्यांचा कारावास आणि 2 हजार रुपये दंड, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा
Vijay Mallya News : सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला माल्याबाबत आधीच विचारणा केली होती.
नवी दिल्ली : विजय माल्या (Vijay Mallya News) याला चार महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय माल्याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश यू. यू. ललित यांच्या सह तीन न्यायाधीशांच्या खंडपिठासमोर ही शिक्षा सुनावण्यात आली.10 मार्चला विजय माल्याच्या विरोधातील निर्णय न्यायालयानं राखून ठेवला होता. 9 मे 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्या याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी दोषी ठरवलं होतं. विजय माल्यानं संपत्तीशी संबंधित माहिती न्यायालयात सादर केली नव्हती. विजय माल्याने डीएगो डीलमधून (Diego Deal) सुमारे 40 मिलीयन डॉलर आपल्या मुलांच्या खात्यात वळवले होते. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. न्यायालयाच्या संमतीशिवाय विजय माल्या ट्रान्झेक्शन करू शकत नव्हता. तरीही त्यानं तसं केलं होतं. 40 मिलियन डॉलर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीत जमा करावेत, अशी मागणी बँकेनं केली होती. मात्र त्याने हे पैसे परस्पर मुलांच्या खात्यात वळवल्यानं त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.
सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
न्यायलयाचा अवमान केल्याप्रकऱणी दोषी ठरवण्यात आलेल्या विजय माल्याला शिक्षा सुनावताना सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, की विजय माल्या याना चार आठवड्यांची मुदत देण्यात येते आहे. या चार आठवड्यात चाळीस मिलियन डॉलर इतकी रक्कम व्याजासकट न्यायालयाच्या रजिस्ट्रीत जमा करावी. अन्यथा विजय माल्याशी संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
Supreme Court directs Vijay Mallay to depist 40 million USD with interest within four weeks. Authorities asked to take attachment proceedings in case of his default.
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2022
माल्यावर 9 हजार 200 कोटींचे कर्ज
सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला माल्याबाबत विचारणा केली होती. त्यावर केंद्र सरकारनेही उत्तर देत, माल्याला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलंय होतं. विजय माल्यावर तब्बल 9 हजार 200 कोटी कर्ज असल्याचं एसीबीआयनं म्हटलं होतं. यावर कर्जाची परतफेड करण्याइतके पैसे आपल्याकडे नाहीत, असं विजय माल्याने म्हटलं होतं. तसंच आपली संपत्तीही जप्त केली असल्याचं स्पष्टीकरण त्यांने दिलं होतं.
मुलाच्या खात्यात परस्पर पैसे वळवले
9 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयानं विजय माल्या याला दोषी ठरवण्यात आलं होतं. कंटेम्प ऑफ कोर्ट म्हणजेच, न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी माल्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. विजय माल्यानं डीएगो डीलमधून मिळालेली रक्कम आपल्या मुलांच्या खात्यात परस्पर वळवली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज अखेर शिक्षा सुनावली आहे.