स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, छोटे-छोटे कम्पार्टमेंट बनवून काळे कृत्य, सांगली पोलीस डमी बनून गेले आणि…
सांगली पोलिसांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. सांगली बस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाने अक्षरश: देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्पा सेंटर उद्ध्वस्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.
सांगली | 8 ऑगस्ट 2023 : सांगली शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सांगली बस स्टॅन्डपासून अगदी हाकेच्या अंतरावर काही विकृतांचा अतिशय किळसवाणा आणि संतापजनक प्रकार सुरु होता. आरोपी स्पा सेंटरच्या नावाने चक्क वेश्या व्यवसाय करत होते. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे आपण महिला सुरक्षेच्या घटनांवर चिंता व्यक्त करतो, महिलांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगू द्यावं, त्यांना त्यांचे मनासारखे निर्णय घेऊ द्यावेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, महिलांचा सन्मान करावा, असं आवाहन करत असतो. पण दुसरीकडे सांगली सारख्या शहरात गजबजलेल्या परिसरात अशाप्रकारचे इतकं घृणास्पद कृत्य सुरु होतं हे लाजिरवाणं आणि शरमेनं मानी खाली घालवणारं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. या स्पा सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पा सेंटर चालवणारा आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सांगली शहरातील बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या इमारतीत डिलक्स स्पा नावाच्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. सांगली शहर पोलिसांना या स्पा सेंटरची खबर लागताच त्यांनी संबंधित स्पा सेंटर उद्ध्वस्त केला आहे. सांगली शहर पोलिसांनी डिलक्स स्पा सेंटरमध्ये छापा टाकल्यानंतर पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर चौकशी करुन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
स्पा सेंटरमध्ये चार छोटे-छोटे कम्पार्टमेंट
स्पा सेंटरमध्ये चार छोटे छोटे कम्पार्टमेंट करण्यात आले होते. या कम्पारटमेंटमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. विशेष म्हणजे संबंधित प्रकार जिथे घडत होता तो परिसर सांगली शहराचा अतिशय मध्यवर्ती परिसर आहे. सांगली बस स्टॅन्डच्या बरोबर समोर असलेल्या चौकातील इमारतीत हा स्पा सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरु होता.
पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला आणि स्पा सेंटर उद्ध्वस्त
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना या विकृत व्यवसायाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित स्पा सेंटर उधळून लावण्यासाठी रणनीती आखली. पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये डमी कस्टमर पाठवला. यातून पोलिसांनी खरंच स्पा सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरु आहे का? याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी थेट छापा टाकला. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटर उद्ध्वस्त केला.
एकाला अटक, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु
पोलिसांनी स्पाच्या नावाने वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी विक्रम कल्याणकर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तर इम्रान मुल्ला या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आणि अतिशय रहदारीच्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य सुरु असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.