नाशिक / 8 ऑगस्ट 2023 : विवाहेच्छुक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याने लग्नाचे आमिष दाखवत त्यांची फसणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. लग्न जमवण्यासाठी मुलीच्या घरच्यांना पैसे देणे, लग्न जमवणाऱ्या एजंटला पैसे देणे किंवा लग्नानंतर मुलीने दागिने, पैसे घेऊन पळून जाणे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशीच घटना नाशिकमधील येवला तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला पोलिसांनी आठ जणांच्या टोळीला अटक केली आहे. तालुक्यातील येथील गारखेडा येथील युवकाचे लग्नानंतर फसवणूक झाली होती. या संदर्भात या युवकाने येवला तालुका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपींच्या नागपूर येथून मुसक्या आवळल्या. आतापर्यंत अशा प्रकारच्या पाच तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. येवला तालुक्यातील विवाहेच्छुक तरुणांची ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा लोकांनी येवला पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गेल्या 15 दिवसात पाच विवाहेच्छुक तरुणांची फसवणूक केल्याच्या तक्रारी येवला पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. लग्नासाठी वधू आहे, असे सांगून तरुणांची फसवणूक करण्यात आली. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक वाघ साहेब, अॅडीशनल एसपी अनिकेत भारती यांना तक्रारींची कल्पना देण्यात आली. यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत एक पथक तयार केले.
या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचे लोकेशन ट्रेस केले असता मुख्या आरोपी एजंट नागपुरात असल्याची माहिती मिळाली. मुख्य आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन अन्य सात जण अशा आठ लोकांना येवला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश जठार, अंजना जठार, सचिन निगुठ, भाऊसाहेब मुळे, शंकर शेंडे, दिलेश्वरी राणी, सुजाता निर्मलकर, किरण खुले अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.