Mumbai Crime : जुहूमधून अपहरण झालेली मुलगी जोगेश्वरीत सापडली, पोलिसांनी केक कापून सेलिब्रेट केला आनंद
जुहू परिसरातून एका पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. मुलीचा शोध घेण्यासाठी जुहू पोलिसांनी तीन दिवस जंग जंग पछाडले. अखेर मुलगी सुखरुप सापडली अन् पोलिसांना आकाश ठेंगणे झाले.
मुंबई / 26 ऑगस्ट 2023 : आपल्या कुशल कामगिरीसाठी मुंबई पोलिसांचं नेहमीच कौतुक होत असतं. बड्या बड्या गुन्हेगारांना चारी मुंड्या चित करणारे पोलीस पुन्हा एकाद चर्चेत आले आहेत. एका अपहहृत मुलीचा शोध लागल्यानंतर पोलिसांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग पोलिसांनी पोलीस ठाण्यातच केक कापून मुलगी सापडल्याचा आनंद साजरा केला. तीन दिवसांपूर्वी जुहू परिसरातून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. पोलिसांनी तीन दिवस कसून शोध घेत मुलीचा शोध घेतला. मुलीची जोगेश्वरी परिसरातून सुटका केली. मग पोलीस ठाण्यात सेलिब्रेशन केले आणि मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. जुहू पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामाचे सर्वजण कौतुक करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अजय पवार असे अटक आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
जुहू परिसरात राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीचे तीन दिवसापूर्वी अपहरण झाले होते. मुलगी गायब झाल्याने पोलिसांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. यानंतर पालकांनी जुहू पोलीस ठाणे गाठत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर संपूर्ण झोनचे पोलीस मुलीच्या शोधात कामाला लागले. रेल्वे स्टेशन, जीआरपीसह मुंबईतील झोपडपट्ट्या आणि भीक मागणाऱ्या टोळ्यांमध्ये शोध घेऊनही मुलगी सापडली नाही.
आईसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून अपहरण
जुहू पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना कैद झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेत तिला जोगेश्वरी परिसरातून आरोपीसह ताब्यात घेतले. अजय पवार असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या आईसोबत आरोपीचे भांडण झाले होते. याच भांडणाच्या रागातून त्याने मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून केक कापूस सेलिब्रेशन
मुलगी मिळाल्यानंतर जुहू पोलिसांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पोलिसांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदात जुहू पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीसोबत केक कापून आनंद साजरा केला. त्यानंतर मुलीला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. जुहू पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.