Mumbai Crime : नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही आरोपींनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
मुंबई / 11 ऑगस्ट 2023 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. रायगड पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करत अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी हाटकोर्टाने आरोपींना अटकेपासून दिलासा नाकारला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे. पुढील सुनावणीत आरोपींना अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही? हे ठरवू, असेही कोर्ट पुढे म्हणाले. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर.एन.लड्ढा यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी झाली. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राज कुमार बन्सल, चेअरमन रेशेश शाह आणि अन्य दोघांनी त्यांच्याविरोधात दाखल एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे हायकोर्टाकडे केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर.एन.लड्ढा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. मात्र एफआयआर रद्द करण्याबाबत खंडपीठाने पुढील शुक्रवार ठरवू असे सांगत आजची सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
एडलवाईजमधील लोकांव्यतिरिक्त, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) द्वारे अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्त करण्यात आलेले जितेंद्र कोठारी यांनी देखील उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र या प्रकरणात पुढील सुनावणी 18 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे .
प्रकरण काय आहे ?
कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत राज कुमार बन्सल, रेशेश शाह आणि अन्य दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर के बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आपली जीवनयात्रा संपवली.