कार चोरी करायचे, नंबर प्लेट बदलून विकायचे; ‘असा’ लागला चोरीचा छडा
ही टोळी कार चोरी करायची. नंतर कारचा चेसीस नंबर आणि इंजिन क्रमांकासह डुप्लिकेट आरसी बुक बनवून ती विकायचे. गोरेगाव पोलिसांनी अशा 5 गाड्या जप्त केल्या आहेत.
मुंबई : कार चोरी करुन विकणाऱ्या एका टोळीला जेरबंद (Gang Arrest) करण्यास गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. या टोळीत एकूण सात जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 गाड्या जप्त (Car Seized) केल्या आहेत. एका कार चोरी (Car Theft) प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली.
ही टोळी कार चोरी करायची. नंतर कारचा चेसीस नंबर आणि इंजिन क्रमांकासह डुप्लिकेट आरसी बुक बनवून ती विकायचे. गोरेगाव पोलिसांनी अशा 5 गाड्या जप्त केल्या आहेत.
फिर्यादीची गॅरेजमध्ये बनवण्यासाठी दिलेली कार विकली
तक्रारदाराने एका कंपनीकडून ऑक्सनची कार खरेदी करून गोरेगाव येथील कार मेकॅनिकला बनवण्यासाठी दिली होती. मात्र कार मेकॅनिकने आपल्या साथीदारांसह कारची नंबर प्लेट आणि त्याच चोरीच्या कारच्या इंजिन क्रमांकाचा चेसीस क्रमांक बदलून कार नाशिकला नेऊन विकली.
गाडीवर चालान आल्याने फिर्यादीला शंका आली
गाडीवर ट्रॅफिक चालान येऊ लागल्यावर तक्रारदाराला संशय आला. गाडी गॅरेजमध्ये असताना चालान कसे येईल. पोलिसांनी गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारचे लोकेशन आणि तत्सम दुसरी कार शोधली असता, चोरीची दुसरी कार ओशिवरा परिसरात चालत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी गॅरेज मालक आणि चोरीची कार जप्त केली.
गॅरेज मेकॅनिक आणि त्याच्या इतर चोरट्यांनी मिळून गॅरेजमध्ये बनवण्यासाठी आलेली कार चोरली आणि नंतर गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारची नंबर प्लेट आणि इंजिन नंबर लावून ती विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. चौकशीत आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.