लग्नात शेरवानी घालण्यावरुन वाद, वधूपक्षाची वऱ्हाडींवर दगडफेक, नवरदेवाला पळता भुई थोडी
वराने घातलेल्या शेरवानीवर मुलीकडच्यांचा तीव्र आक्षेप होता. असे असूनही, वर सुंदरलाल शेरवानी घालून मंडपात आला तेव्हा वधूची काकी झिग्गूबाईंनी आक्षेप घेतला आणि सांगितले की, परंपरेनुसार धोती-कुर्ता घालून कुलदेवीसमोर फेऱ्या मारल्या जातात,
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात (Madhya Pradesh Crime News) लग्नादरम्यान वराला शेरवानी घालणं महागात पडलं. यावरून झालेल्या वादातून वधू पक्षातील (Fight in Wedding) मंडळींनी मिरवणुकीत वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. आता पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे विचित्र प्रकरण धार जिल्ह्यातील धामनोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मांगबायडा गावात धार येथून मिरवणूक आली होती, मात्र वराने शेरवानी परिधान केली होती. इथूनच वादाला सुरुवात झाली, कारण आदिवासी परंपरेनुसार लग्नात वराला धोती-कुर्ता परिधान करावा, असे वधूपक्षाने सांगितले.
काय आहे प्रकरण?
वराने घातलेल्या शेरवानीवर मुलीकडच्यांचा तीव्र आक्षेप होता. असे असूनही, वर सुंदरलाल शेरवानी घालून मंडपात आला तेव्हा वधूची काकी झिग्गूबाईंनी आक्षेप घेतला आणि सांगितले की, परंपरेनुसार धोती-कुर्ता घालून कुलदेवीसमोर फेऱ्या मारल्या जातात, मात्र वऱ्हाडी ठाम होते की वर शेरवानीतच सप्तपदी घेईल.
वधूपक्षाकडून दगडफेक
यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या वादात वधू पक्षाच्या लोकांनी दगडफेक सुरू केल्याने वऱ्हाडींना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धामनोद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील यदुवंशी यांनी सांगितले की, आदिवासी समाज धार येथून मंगबायडा येथे आला होता.
सात फेरे घेताना वराने धोती-कुर्ता घालावा, असा मुलीच्या बाजूचा हेका होता. मुलीने वराला शेरवानीऐवजी धोती-कुर्ता घालण्याचा आग्रह केला, मात्र दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाल्याने हाणामारी झाली. दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यातही आले होते. त्याचबरोबर वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.