Bhandara Crime : उसने पैसे परत दिले नाही म्हणून घरातून अपहरण, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या तीन तासात सुटका
उसने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून कर्जदाराने जे केले ते पाहून सर्वांना धक्काच बसला. पोलिसांनी तत्परता दाखवत तीन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
भंडारा / 25 जुलै 2023 : उसने घेतलेले पैसे परत देत नव्हता, म्हणून कर्जदाराने थेट व्यक्तीचे घरात घुसून अपहरण केल्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. लाखनी तालुक्यातील सिंधीपार-मुडीपार येथे ही घटना घडली. याप्रकरणी घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तीन तासात अपहृत व्यक्तीची सुटका केली. नरेश मारुती येळेकर असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादंवीच्या कलम 364, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक केली असून, धीरज प्रकाश बरीयेकर असे अटक आरोपीचे नाव आहे.
उसने पैसे परत करत नव्हता म्हणून अपहरण
येळेकर यांनी आरोपीकडून दीड लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे येळेकर परत करत नव्हते. याच रागातून दोन पुरुष आणि एक महिला त्यांच्या घरी आले. त्यांनी येळेकर यांच्याकडे चेक आणि आधारकार्ड मागितले. मग बळजबरीने येळेकर यांना मारुती स्विफ्ट कारमध्ये बसवून घेऊन गेले. यावेळी येळेकर यांच्या मुलाला पाठलाग केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी तीन तासात केली सुटका
येळेकर यांच्या मुलाने लाखनी पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास हाती घेतला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनी पोलिसांनी एक पथक बनवले. यादरम्यान येळेकर यांच्या मुलाला मोबाईलवर सातत्याने पैशांसाठी फोन येत होते. यादरम्यान पोलिसांनी तांत्रिक मदतीने आरोपींचा ठावठिकाणा काढत सापळा रचून अटक केली. अवघ्या तीन तासात पोलिसांनी अपहृत व्यक्तीची सुटका केली.