त्यानं अधिकाऱ्यांच्या भीतीने 250 ग्रॅमची आठ सोन्याची बिस्कीटं गिळली, मग पोटात लागलं दुखू…
तस्कराच्या आतड्यात जर ही बिस्कीटं अडकून आतडी फाटले तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका असल्याने त्याच्यावर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू जे.जे. च्या डॉक्टरांनी एक आयडीया केली...
मुंबई : विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी तस्कर अनेक कृल्प्त्या करीत असतात. कधी ड्रग्जच्या गोळ्या गिळतात. किंवा आपल्या शरीरात लपवतात. ( Body Packing ) परंतू एका तस्कराने सोन्याची आठ बिस्कीट ( Gold Biscuits ) गिळल्याने त्याला जे.जे. रूग्णालयात ( J.J. Hospital ) दाखल करण्याची वेळ आली. या तस्कराने 250 ग्रॅमची सोन्याची आठ बिस्कीटे गिळल्याने तस्कराची तब्येतही बिघडली आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. त्यामुळे अखेर त्याला जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने या बिस्कीटातून त्यांची सुटका करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.
उत्तरप्रदेशाचा रहीवासी असलेला 30 वर्षीय इंतिजार अली याला प्रत्येकी तीन ते पाच सेंटीमीटर लांबीची आठ सोन्याची बिस्कीटे गिळल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी जे.जे.रुग्णालयात दाखल केले. अशा प्रकारची केस प्रथमच जे.जे. रुग्णालयात प्रथमच दाखल झाल्याने डॉक्टरांची कसोटी लागली. ड्रग्ज स्मगलिंग करणारे अशाप्रकारे शरीरात ड्रग्जच्या कॅप्सूल लपवून आणतात हे माहीत होते. परंतू सोने इतक्या मोठ्या प्रमाणात गिळल्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे सर्जरी डिपार्टमेंटच्या सहायक प्राध्यापिका डॉ.सुप्रिया भोंडवे यांनी सांगितले. आम्ही अली याचे एक्सरे आणि सोनाग्राफी केली तेव्हा सोन्याची बिस्कीटे त्याच्या छोट्या आणि मोठ्या आतड्यात अडकल्याने त्याला वेदना होत असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईला येण्यासाठी विमानाने उड्डाण घेतले तेव्हा 6 मे रोजी ही सोन्याची बिस्कीटे गिळल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी दोन दिवस वाट पाहीली
डॉक्टरांनी अली याला निरीक्षणाखाली ठेवत दोन दिवस वाट पाहीली. परंतू त्यांच्या स्टूलमधून ती सोन्याची बिस्कीटे काही बाहेर आली नाहीत. परंतू त्याच्या बिस्कीटांची काहीही हालचाल न दिसल्याने त्याच्या पोटावर लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. छोट्या आतड्यात जर हे बिस्कीट अडकून आतडी फाटले तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला. परंतू पेशंट काही त्याच्यावरील ऑपरेशनसाठी संमती देत नसल्याने अडचण आली.
फायबर आहाराचा खुराक
त्यानंतर अलीला हाय फायबर डाएट देण्यास सुरुवात करण्यात आली. त्याला भरपूर केळी, पालेभाज्या आणि दिवसातून तीन लिटर पाणी प्यायला देण्यात आले. एरव्ही ड्रग्जच्या कॅप्सूल गिळणाऱ्यांना जुलाब होणारी औषधे दिली जातात. परंतू सोने असल्याने इजा होऊ नये म्हणून भरपूर फायबर असलेले पदार्थ देण्यात आले. शेवटी गुरूवारी सायंकाळी अली याच्या शौचातून आठही सोन्याची बिस्कीटे बाहेर आली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.