पती आहे की हैवान ! शरीराचा एकही अवयव ठेवला नाही; महिलेच्या हत्येने सर्वच हादरले
काही दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांना मानेसरमधील एका गावात एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता.
नवी दिल्ली : काही माणसं एवढी क्रूर असतात की त्यांना माणूस म्हणून तरी कशी हाक मारावी असा प्रश्न पडतो. हरियाणातही असाच एका अमानुष प्रकार समोर आला आहे. हरियाणातील (Haryana) मानेसरमध्ये पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने पत्नीची निर्घृण (killed wife) हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने तिचे हात कापले, शीर धडावेगळे केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर नंतर त्याने पत्नीचा मृतदेह जाळण्याचाही (burnt dead body) प्रयत्न केला. आरोपी पतीने आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी महिलेचे कापलेले शीर आणि शरीराचे सर्व अवयवही जप्त केले आहेत.
खरंतर, 21 एप्रिल रोजी पोलिसांना मानेसर गावात एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे डोके गायब होते, तसेच हातही कापलेले होते. या महिलेचा दुसरीकडे कुठेतरी खून झाल्याचा संशय पोलिसांना होता.
यानंतर पोलिसांना 23 एप्रिलला त्या महिलेचे कापलेले हात आणि 26 एप्रिलला तिचे शीर मिळाले. खेरकिदौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे शीर सापडले. याप्रकरणी पोलिसांनी आता महिलेच्या पतीला अटक केली आहे. तो गांधीनगरचा रहिवासी आहे. तो मानेसर येथे भाड्याने राहत होता. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकाजवळील कुकडोला गावात एका घरातून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. उमेद सिंग नावाच्या व्यक्तीने करारावर घेतलेल्या जमिनीत हे घर बांधले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकातून कासन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उमेदसिंग यांनी आठ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. उमेद सिंग यांनीच मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली.
उमेद सिंहने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, माझ्या शेजाऱ्याने मला फोनवर सांगितले की, माझ्या शेतात बांधलेल्या घरातील एका खोलीतून धूर निघताना दिसला. शेतात गेलो असता खोलीत अर्धे जळालेले धड आढळून आले. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आता पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा करत आहेत.