Kalyan Crime : फेरीवाला बनून प्रवाशांना लुटायचे, अखेर ‘असे’ अडकले जाळ्यात
प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत होत्या. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश केला.
कल्याण / 23 ऑगस्ट 2023 : चालत्या मेल एक्सप्रेसमध्ये फेरीवाला बनून प्रवाशांचे मोबाईल पर्स आणि दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 17 मोबाईल, महागडी घड्याळं यासह जवळपास 9 लाखाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. एका महिला प्रवाशाची लूट केल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत टोळीचा शोध सुरु केला. अखेर या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे.
एर्नाकुल्लम निजामउद्दीन एक्सप्रेसमध्ये महिलेला लुटले
मेल एक्सप्रेसमध्ये एसीच्या डब्यात प्रवाशांचे किंमती वस्तू चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. पूर्णिमा बेन शर्मा या महिला 13 एप्रिल रोजी एर्नाकुल्लम निजामउद्दीन या एक्सप्रेस प्रवास करीत होत्या. प्रवासात त्या वाशरूममध्ये गेल्या तेव्हा त्यांची पर्स सीटवर होती. त्या परत आल्या तर त्यांची पर्स त्या जागेवरून गायब होती. त्यांच्या पर्समध्ये मोबाईल, एटीएम कार्ड आणि दागिने होते. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस पथकाने रत्नागिरीतून केली आरोपींना अटक
रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश चिंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख, हेमराज साठे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे विशेष पथक बनवत तपास सुरु केला. अखेर तपास करत महिलेचा चोरीस गेलेले एक एटीएम कार्ड वापरण्यात आल्याने त्यातील व्यवहारामुळे पोलिसांना सुगावा लागला आणि गुप्त महितीदार आणि तांत्रिक बाबी तपासून पोलिसांनी रत्नागिरीहून तीन जणांना अटक केली.
तिन्ही आरोपी परप्रांतीय असून, गाडीत फेरीवाला बनून प्रवास करायचे. संधी साधून प्रवाशांच्या किंमती वस्तू चोरायचे. या तिघांकडून 8 लाख 58 हजार 288 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचे दागिने, महागडे घड्याळ, 17 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.