Yavatmal Youth Killed : जुना वाद उफाळून आला, वाढदिवसादिवशीच चौघांनी मिळून तरुणाचा काटा काढला !
यवतमाळ जिल्ह्यातील काम शहरातील अश्विन राऊत या तरुणाची पूर्व वैमनस्यातून काल मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनेनंतर आरोपींच्या अटकेची मागणी करत नागपूर-तुळजापूर महामार्ग रोखून धरला.
यवतमाळ : पूर्व वैमनस्यातून वाढदिवसाच्याच दिवशी तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील कळंब परिसरात घडली आहे. अश्विन राऊत असे हत्या करण्यात आलेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कळंबमधील इंदिरा चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मयत तरुण अवैध दारुचा धंदा करत असून, पैशांच्या देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला
अश्विन राऊत हा कळंब येथी हलबीपुरा परिसरातील रहिवासी आहे. तरुण कळंब येथील इंदिरा चौकात उभा असताना दोन दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी तरुणाच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. त्यानंतर चाकूने पोटात सपासप वार केले. त्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
घटनेनंतर चारही जण दुचाकी सोडून फरार झाले. तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संपत भोसले, ठाणेदार अजित राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींच्या अटकेसाठी नागरिकांकडून महामार्गावर चक्काजाम
यवतमाळ जिल्ह्यातील काम शहरातील अश्विन राऊत या तरुणाची पूर्व वैमनस्यातून काल मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनेनंतर आरोपींच्या अटकेची मागणी करत नागपूर-तुळजापूर महामार्ग रोखून धरला.
मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा तसेच ठाणेदारांचे निलंबन करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. चक्काजाममुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर तब्बल 3 तासानंतर आंदोलनमागे घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गेल्या 16 दिवसात 10 हत्येच्या घटना
यवतमाळ जिल्ह्यासाठी नववर्ष रक्तरंजित ठरतेय. गेल्या 16 दिवसांत जिल्ह्यांत हत्येच्या 10 घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर ‘क्राईम रेट’ कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दर दिवसाआड एक हत्या होत आहे.
कळंब आणि राळेगाव तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी दोघांचा खून करण्यात आल्याने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे.