Crude Oil Inflation : महागाईपासून सूटका विसरुनच जा! पेट्रोल-डिझेल भडकणार?
Crude Oil Inflation : महागाईपासून तुमची सूटका होण्याची आता सूतराम शक्यता नाही. जागतिक घडामोडीच अशा घडत आहे की, त्यामुळे जगावर महागाईचा बॉम्ब पडणार आहे. त्याचा फटका केवळ भारतालाच नाही तर बलाढ्य अमेरिकेला पण बसणार आहे.
नवी दिल्ली : जागतिक घडामोडींमुळे अनेक गरीब देश, विकसनशील देश भरडल्या जाणार आहेतच, पण अमेरिका आणि युरोपातील मोठ्या अर्थव्यवस्थांना (Big Economies) ही मोठा फटका बसणार आहे. रशिया-युक्रेन युद्धावरुन सुरु असलेल्या भूराजकीय घडामोडींचा हा परिपाक आहे. अमेरिकेसह युरोपवर दबावतंत्राचा वापर म्हणून कच्चा तेलाचे उत्पादन (Reduce of Crude Oil) घटविण्यात आले आहे. 1973 साली ओपेक संघटनेने अमेरिकेचा व्यवहार ठप्प पाडला होता. इतकी ताकद या देशांमध्ये आहे. रशियाच्या बाजूला झुकलेल्या या संघटनेच्या माध्यमातून नवीन खेळी खेळण्यात येत आहे. पण त्याचा मोठा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. भारतात इंधनाचे दर वाढल्यास महागाईचा भडका उडेल.
असा बसेल फटका सौदी अरबसह 23 देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली. हे सर्व देश मिळून 19 कोटी लिटर कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करतील. त्यामुळे इंधनाची किंमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढतील. त्याचा भारतासह जगावर थेट परिणाम होईल. म्हणजे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल-डिझेल महाग होईल.
तेल उत्पादन कपातीची कारणे काय फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 139 डॉलर प्रति बॅरल झाल्या. 2008 नंतर पहिल्यांदाच किंमती एवढ्या वाढल्या होत्या. अमेरिका आणि रशियाने त्यांचे राखीव कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. त्यानंतर किंमतीत घसरण झाली. त्यामुळे मार्च 2023 मध्ये किंमती घसरुन 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या.
जगात चीनसह अनेक देशात या वर्षात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे या देशात निर्बंध आले होते. परिणामी कच्चा तेलाचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे अनेक देशाचा तेल साठा वाढला होता.
2008-2009 मध्ये आर्थिक संकट कोसळल्यावर, मंदीने घेरल्यावर कच्चा तेलाचे भाव 148 डॉलर वरुन 32 डॉलरवर आले होते. आता ही अमेरिकेसह युरोपातील अनेक बँकांचे दिवाळ निघत असल्याने कच्चा तेलाच्या किंमती फार काळ उच्चांकी पातळीवर राहणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
काय होईल परिणाम भूराजकीय- रशिया-युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. पण भारताचे संबंध चांगले असल्याने रशियाने स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा केला. पण आता कच्चा तेलाचा वापर राजकीय खेळीसाठी करण्यात येत असल्याचे दिसून येते. या किंमती मोठ्या परिणाम करतील.
मागणी आणि पुरवठा- कच्चा तेलाची मागणी वाढली आहे आणि उत्पादनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. आता मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
ओपेकची भूमिका काय- आता या भूराजकीय घडामोडीत तेल उत्पादक देशांना हात धुऊन घ्यायचे आहे. तेल उत्पादक देश रग्गड कमाईच्या तयारीत आहे. त्यामुळेच OPEC+देशांनी दररोज 16 लाख बॅरल तेलाचे उत्पादन घटवले आहे.
भारतावर काय होईल परिणाम एप्रिल ते डिसेंबर 2022 या दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यामधील जवळपास 19% कच्चे तेल रशियाकडून आलेले होते. या नऊ महिन्यात भारताने सौदी अरब आणि इराक पेक्षा रशियाकडून जास्त कच्चा तेलाची खरेदी केली. त्यामुळे भारताला प्रति बॅरल 2 डॉलरचा फायदा झाला आहे.
अर्थात ओपेक देशाच्या भूमिकेचा भारतावरही परिणाम होईल. कारण या ग्रुपमध्ये रशिया पण सहभागी आहे. तेलाचे उत्पादन घटवल्याने भारताला होणाऱ्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. जगभरात कच्चा तेलाच्या किंमती भडकण्याची भीती आहे. तर सध्या सवलतीत मिळणारे रशियाचे कच्चे तेल पण महागणार. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दहा रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.