Gautam Adani Family : सात भावंडांसह चाळीत राहत होते गौतम अदानी, कुटुंबात आता कोण काय करते?
Gautam Adani Family : अदानी कुटुंबियांनी स्वतःच्या हिंमतीवर आकाश मोठे केले, काय आहे त्यांची यशगाथा..
नवी दिल्ली : कधी काळी आशियातील सर्वात श्रीमंत असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांना एका रिपोर्टने तगडा झटका दिला. अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाला मोठा हादरा बसला. भयकंप वाढल्याने अनेक आघाड्यांवर अदानी समूहाला बॅकफुटवर यावे लागत आहे. अदानींच्या संपत्तीत सातत्याने घसरण होत आहे. जगातील सर्वात झपाट्याने संपत्तीत घसरण होणाऱ्या काही श्रीमंतांच्या यादीत अदानी यांचा क्रमांक लागला आहे. श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या गौतम अदानी आता थेट 16 व्या स्थानावर फेकले गेले आहेत. दरम्यान अदानी एंटरप्राईजेसने एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याची घोषणा केली. अवघ्या दोन आठवड्यातच अदानींच्या साम्राज्याला मोठे तडे गेले आहेत.
अदानी यांनी शुन्यातून हे साम्राज्य उभारले आहे. कधी सात भावंड आणि आई-वडिलांसह अदानी एका छोट्या चाळीत राहत होते. आज त्यांच्या अनेक कंपन्यांचीच मालमत्ता कोट्यवधींची आहे. त्यांच्या कंपन्यांचे जाळे जगभर पसरले आहे. त्यांच्या या प्रवासाची कहाणी तेव्हढीच रोचक आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील एका सामान्य कुटुंबात गौतम अदानी यांचा 24 जून 1962 रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदाबाद येथील सेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयात झाले. त्यानंतर गुजरात महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य (Commerce) शाखेत शिक्षण पूर्ण केले. पण दुसऱ्याच वर्षी त्यांना शिक्षण सोडावे लागले.
गौतम अदानी यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल तर आईचे नाव शांता बेन आहे. त्यांचे वडील कपड्याचा व्यापार करत. गौतम अदानी त्यांच्या कुटुंबियांसह एका चाळीत राहत होते. अहमदाबाद पूर्वी अदानी कुटुंबिय गुजरातमधील थरद शहरात राहत होते.
गौतम अदानी यांच्यासह सात भावंडे आहेत. त्यात सर्वात मोठे मनसुखभाई, विनोद, राजेश, महासुख आणि वसंत अदानी ही भावंडं आहेत. त्यांच्या बहिणीविषयी फार काही माहिती मीडियामध्ये उपलब्ध नाही.
विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत. विनोद अदानी हे दुबईत राहतात. तिथूनच ते सिंगापूर, जकार्ता येथील कंपन्यांचा कारभार पाहतात. काही दिवसांपूर्वी IIFL Wealth Hurun India Rich List 2022 यादीत त्यांचा अग्रक्रम होता. विनोद अदानी यांच्यावरही कंपन्यांच्या अनियमितपणाचा आरोप आहे.
गौतम अदानी अवघ्या 17 व्या वर्षी मुंबईत दाखल झाले. त्यांनी हिरे व्यापारी महिंद्रा ब्रदर्स यांच्याकडे दोन वर्ष काम केले. त्यानंतर मुंबईतच त्यांनी डायमंड ब्रोकरेजचा व्यापार सुरु केला. त्याचवर्षी त्यांना मोठा फायदा झाला.
गौतम अदानी यांचे मोठे बंधू मनसुखभाई अदानी यांनी 1981 मध्ये एक प्लास्टिक कंपनी खरेदी केली. त्यांनी गौतम अदानी यांनी या उद्योगात मदतीसाठी बोलावून घेतले. पॉलिविनाईल क्लोराईडच्या (PVC) आयातीतून त्यांनी जागतिक बाजारात पाऊल टाकले.
या व्यवसायाचा मोठा अनुभव गाठिशी बांधत 1998 मध्ये अदानी एक्सपोर्ट्स लिमिटेडची सुरुवात करण्यात आली. ही कंपनी ऊर्जा आणि वायदेबाजारात काम करते. या कंपनीने सुरुवातीच्या काळातच जम बसविला आणि मोठा फायदा मिळविला.
सुरुवातीच्या काळात अदानी हे स्कूटरवरुन प्रवास करत. त्यानंतर मारुती-800 मधून त्यांचा प्रवास सुरु झाला. आज व्यापार आणि साम्राज्य प्रचंड वाढले आहे. आता त्यांच्या ताफ्यात अनेक आलिशान कार आहेत. गौतम अदानी यांच्याकडे हेलिकॉप्टर आणि खासगी चार्टर्ड प्लेन आहे.
गौतम अदानी यांनी प्रिती अदानी यांच्यासोबत लग्न केले आहे. प्रिती या दंतवैद्य आहेत. अदानी फाऊंडेशनच्या त्या अध्यक्ष आहेत. यामार्फत अनेक सामाजिक कार्य करण्यात येतात. गौतम आणि प्रिती अदानी या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. करण आणि जीत अशी त्यांची नावे आहेत.
करण अदानीने अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. ते अदानी पोर्टसचे सीईओ म्हणून कंपनीत काम करत आहेत. यासोबतच इतर कंपन्यांचे व्यवस्थापन आणि जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर आहे. 2013 मध्ये करणचे लग्न प्रसिद्ध विधीज्ञ सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी श्रॉफ हिच्यासोबत झाले.
जीत अदानी याचे शिक्षण परदेशातच झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियामधून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. 2019 मध्ये शिक्षण पूर्ण करुन जीत अदानी आता कंपनींच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.