Success Story : शिक्षकाची नोकरी सोडली, दोन्ही भावांनी सुरू केला नर्सरीचा व्यवसाय, असे वाढले उत्पन्न
नर्सरीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर या दोन्ही भावांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. आता हे दोन्ही भाऊ युवकांसाठी प्रेरणास्थान झाले आहेत.
नवी दिल्ली : शेतीत कष्ट जास्त आणि फायदा कमी असल्याने लोकं नोकरीकडे धाव घेतात. खासगी नोकरी करण्यासाठीही लोकं रांगेत उभे राहतात. पण, आता आपण अशा दोन भावांविषयी पाहत आहोत ज्यांनी शेतीशी संबंधित काम करण्यासाठी खासगी नोकरी सोडली. आता हे दोघेही भाऊ फूल, फळ आणि भाजीपाल्याची नर्सरी लावतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. नर्सरीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर या दोन्ही भावांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. आता हे दोन्ही भाऊ युवकांसाठी प्रेरणास्थान झाले आहेत.
जमीन घेतली भाड्याने
दोन्ही भाऊ राजस्थानातील करौली जिल्ह्मातील राहणारे आहेत. एकाचं नाव सुरजन सिंह तर दुसऱ्याचं नाव मोहर सिंह आहे. दोघेही आधी खासगी शाळेत नोकरी करत होते. त्यातून त्यांचा घरखर्च भागत नव्हता. त्यामुळे दोघांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला. नर्सरीचा व्यवसाय करण्याची कल्पना सूचली. पण, त्यांच्याकडे जमीन नव्हती. भाड्याने जमीन घेऊन नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून उत्पन्न तर मिळतेच पण पर्यावरणही स्वच्छ राहते.
खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते
सुरजन सिंह म्हणतात, ते आधी खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते. त्यातून त्यांना फारसा पगार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. छोटीशी नर्सरी लावली. यात त्यांना चांगला फायदा झाला. त्यानंतर त्यांनी जास्त जागा भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणात नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. आता लोकं त्यांच्या नर्सरीत रोप खरेदीसाठी येतात.
२० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत रोप
मोहर सिंह म्हणतात, नर्सरीत वेगवेगळ्या प्रकारची रोप आहेत. काही रोप ते कोलकातावरून बोलावतात. त्यांचीही विक्री होते. देशी रोप स्वतः नर्सरीत तयार करतात. आता त्यांच्या नर्सरीत २० रुपयांपासून तर १२०० रुपयांपर्यंत रोप आहेत.