मुंबई : रोहनने नवीन कार घेतली आणि त्याला वाहन विमा (Insurance) घ्यायचा आहे. कोणता प्लॅन घ्यायचा याचा तो विचार करत आहे. कमी प्रीमियमसह अनेक योजना उपलब्ध आहेत, परंतु कोणती योजना घ्यावी यावरून त्याचा गोंधळ उडाला आहे. कमी प्रीमियमच्या (Premium) विमा पॉलिसीमध्ये सर्व प्रकारचे कव्हर येतातच असे नाही. त्यामुळे वाहन विमा घेताना काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत. अपघात, चोरी इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण (Financial protection)मिळवण्यासाठी कार, बाईक किंवा अगदी ट्रक सारख्या वाहनांचा विमा खरेदी केला जातो. थर्ड पार्टी कव्हर, नो क्लेम बोनस, क्लेम सेटलमेंट यांसारख्या अनेक गोष्टी मोटार विमा खरेदी करताना लक्षात ठेवाव्या लागतात. प्रमाण पॉलिसीचे नूतनीकरण आणि IDV म्हणजेच विमा उतरवतानाचे घोषित मूल्य. भारतात कारसाठी वार्षिक 2,000 रुपयांपासून सुरू होते. तर बाईकचे मूल्य 480 रुपयांपासून सुरू होते.
अपघात झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या वाहनामुळे इतर कोणत्याही वाहनाला किंवा थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानाला कव्हर करतो. परंतु तो तुम्हाला किंवा तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानापासून कोणतेही संरक्षण देत नाही. त्यामुळे वाहन मालकांनी स्वत:च्या नुकसानीच्या कव्हरसह सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेणे फायद्याचे ठरते. 2020-21 मध्ये देशात 3,78,343 मोटार अपघात विम्याचे दावे निकाली काढण्यात आले. 57 कोटींहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली होती. नो क्लेम बोनस हे तुमच्या पॉलिसीचं वैशिष्ट्य आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगमुळे नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला प्रीमियमवर सूट मिळते. एका वर्षात दाखल झालेल्या एकूण क्लेमपैकी किती क्लेम विमा कंपनीने निकाली काढले यावरून क्लेम सेटलमेंट रेशिओ ठरतो. कोणत्याही कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो 90 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या कंपनीकडून पॉलिसी खरेदी करावी.
बहुतांश वाहनधारक पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास विसरतात. परंतु पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण न केल्यास त्यांना तोटा सहन करावा लागतो. वाढीव कालावधीदरम्यान पॉलिसीचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी रद्द होते. म्हणजेच तुमच्या वाहनाला विम्याचे कवच नसते. एखाद्या अपघाताच्या वेळेस तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागू शकते. तसेच नूतनीकरणाच्या तारखेनंतर विम्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं प्रक्रिया करावी लागते. तसेच, तुम्ही आत्तापर्यंत जमा केलेला नो-क्लेम बोनस रद्द होतो. त्यामुळे विम्याचे नूतनीकरण वेळेवर करणं आवश्यक आहे.
सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. परंतु संपूर्ण सुरक्षिततेसाठी,सर्वसमावेशक विमासुद्धा असावा,असा सल्ला . Policybazaar.com च्या विमा नूतनीकरण विभागाचे प्रमुख अश्विनी दुबे यांनी दिलाय. त्यामुळे पॉलिसीमध्ये अॅड ऑन कव्हर्सचा समावेश करावा. या अतिरिक्त कव्हर किंवा रायडर्ससाठी जादा हप्ता भरावा लागतो मात्र त्यामुळे तुमचा विमा सर्वसमावेशक होतो.