21 वर्षीय मुलीच्या खात्यात एक दिवस अचानक कुठून तरी खूप पैसे (Money) आले. खूप म्हणजे किती? कोट्यवधी! कल्पना करा काय आयुष्य झालं असेल. तुम्ही काय केलं असतं इतक्या पैशाचं? तिने काय केलं असेल इतक्या पैशाचं? अहो तिने अचानक बँक खात्यात (Bank Account) आलेल्या 18 कोटी रुपयांची चक्क मौजमजा केलीये. पण खरा ट्विस्ट (Twist) तर पुढे आहे. तब्बल 18 कोटी खर्च करून मौज मजा केल्यानंतर तिच्यासोबत आयुष्यात काय झालं हे खरं वाचण्यासारखं आहे. वाचलंत तर तुम्हालाही कळेल की खात्यात असे कुठूनही पैसे आले तर जरा सांभाळून राहावं.
‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, मूळची मलेशियाची रहिवासी असलेली 21 वर्षीय क्रिस्टीन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी मध्ये गेली होती.
तिथे तिनं फी जमा करण्यासाठी वेस्टपॅक बँकेत खाते उघडले. एक दिवस तिने बँकेतून आलेला एक मेसेज पाहिला, त्यात लिहिलं होतं की, तिला अनलिमिटेड ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे.
खरं तर ओव्हरड्राफ्ट हे एक खास वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या खात्यात एक पैसाही नसला तरी पैसे काढू शकता. सहसा बँका यासाठी मर्यादा घालून देतात. हे एक प्रकारचं अल्प मुदतीचं कर्ज आहे, जे आपल्याला नंतर व्याजासह बँकेत परत करावं लागतं.
अनलिमिटेड ओव्हरड्राफ्टचा तो मेसेज वाचून ती अचंबित झाली. बँकेने मागणी न करता ही सुविधा का दिली, हे तिला समजलं नाही.
क्रिस्टीनला बँकेने दिलेली ओव्हरड्राफ्ट सुविधा अमर्याद होती. म्हणजे तिला हवे तेवढे पैसे ती बँकेतून काढू शकत होती. ही माहिती बँकेला न देता क्रिस्टीनने मौजमजेत पैसे खर्च करण्यास सुरुवात केली.
महागडे दागिने, हॅण्डबॅग्ज आणि महागड्या हॉटेल्समध्ये मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करून लाखो रुपये खर्च केले. तसेच ९ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. तसेच अडीच लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले.
अचानक लक्षाधीश झालेल्या क्रिस्टीनने जवळपास 11 महिने ऐशो आरामात काढलं. बँकेत ऑडिट सुरू झालं, तेव्हा कोट्यवधी रुपये गायब झाल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
क्रिस्टीनच्या खात्यात पैसे गेल्याचं आढळून आलं. यानंतर बँकेनं क्रिस्टीनबाबत पोलिसांकडे तक्रार केली, पोलिसांनी तिला अटक करून कोर्टात हजर केलं.
क्रिस्टीनने कोर्टाला सांगितले की, तिला या चुकीची माहिती नव्हती. तिला वाटलं की तिच्या पालकांनी तिच्या खात्यात इतके पैसे हस्तांतरित केले आहेत.
क्रिस्टीनच्या वकिलांनीही कोर्टाला सांगितलं की,त्यांच्या निष्काळजीपणामुळे इतकी मोठी रक्कम क्रिस्टीनच्या खात्यात पोहोचली, जी तिने चुकून खर्च केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने क्रिस्टीनला इशारा देऊन निर्दोष मुक्त केले.पण पोलिसांनी तिचे नऊ कोटी रुपयांचे अपार्टमेंट सील करून उर्वरित मालमत्ता जप्त केल्या.