चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर-1 चा सामना होणार आहे. या मॅचमधील विजेता संघ थेट IPL 2023 च्या फायनलमध्ये दाखल होईल. दोन्ही टीम्सच्या प्रमुख खेळाडूंवर लक्ष असेल. आयपीएल 2023 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी हार्दिक पंड्याने घरच्या मैदानावर एमएस धोनीच्या चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
गुजरात टायटन्सची टीम गोलंदाजीच्या बाबतीत मोहम्मद शमी आणि राशिद खान यांच्यावर अवलंबून आहे. मोहम्मद शमी 24 विकेट घेऊन टॉपवर आहे. चेन्नईची भिस्त ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे या ओपनिंग जोडीवर आहे. त्यांनी टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत चेन्नईला दमदार सुरुवात दिली आहे.
गुजरातचा ट्रम्प कार्ड कोण?
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या मते, गुजरात टायटन्स स्पिन फ्रेंडली ट्रॅकवर स्टार स्पिनर राशिद खानवर सर्वात जास्त अवलंबून आहे. गुजरातसाठी राशिद खान ट्रम्प कार्ड आहे. “राशिद खान गुजरातसाठी ट्रम्प कार्ड आहे. कारण टीमला गरज असताना राशिद खान विकेट काढून देतो. हार्दिकने राशिद खानचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय. राशिदला भागीदारी तोडायला आवडते. सीजनमधील तो यशस्वी गोलंदाज आहे” असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरच्या मते, सीएसके आणि गुजरात टायटन्स दोन्ही टीम्स एकसमान ताकतीच्या आहेत. त्यांच्यामध्ये रंगतदार सामना होईल.
संजय मांजरेकर काय म्हणाले?
“ताकतीचा विचार केल्यास गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या समान ताकतीच्या टीम्स आहेत. या दोन टीम्स प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करत नाहीत” असं संजय मांजरेकर स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाइव्हमध्ये म्हणाला.
हरभजन सिंग काय म्हणाला?
सीएसकेला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळेल, असं भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ला चेपॉकला अभेद्य किल्ला बनवता आलेला नाही. पण प्लेऑफमध्ये खेळण्याचा अनुभव या टीमला फायद्याचा ठरेल.