बुलढाणा : बुलढाण्याचा 19 वर्षीय प्रथमेश जावकरने जागतिक तिरंजादी स्पर्धेत य़श मिळवलं. अटीतटीच्या सामन्यात त्याने नेदरलँडच्या माइक श्र्लोएसवर मात करत शांघाई येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालेय जीवनापासूनच तो वेगवेगळ्या तिरंजादी स्पर्धेत चमकत आहे. सामना दुसऱ्या स्टेजवर गेल्याने रंगतदार बनला होता.
समोर जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हरवणं नक्कीच सोपं नव्हतं. मात्र प्रथमेशने 149-148 या फरकाने सामना जिंकत आपलं पहिले सुवर्ण पदक जिंकलं. यासोबतच भारताने व्यक्तीगत आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात यावर्षी सुवर्ण पदक कमावले.
ओजस देवताळे सुवर्णपदक विजेती कामगिरी
ओजस देवताळे आणि ज्योति सुरेखा वेनम यांनी या जागतिक स्पर्धेत दुहेरी प्रकारात सलग दोन वेळा सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी कोरियाच्या किम जोंघो आणि चोई योंगही या जोडीचा पराभव केला. त्यांनी शेवटचा सामना 156-155 या फरकाने जिंकत सुवर्ण पदक पटकावले. हा सामनाही चागंलाच रंगात आला होता. चौथ्या आणि शेवटच्या टप्यात कोरियाच्या संघाने 38 अंक मिळवले तर भारताने 39 अंक मिळवत हा सामना जिंकला.
प्रथमेश जागतिक क्रमवारीत 54 व्या स्थानी
प्रथमेश जवकरने बुलढाण्यात राहुनच तयारी केलीय. शाळेत असतांनाच त्याला तिरंजादीत आवड होती. त्याने छत्तीसगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले होते. येथून सुरुवात करत त्याने अवघ्या 19व्या वर्षीच जागतिक स्पर्धा जिंकली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवड चाचणीत चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली.
आशियाई स्पर्धा जिंकण्याचा मानस
माध्यमांशी बोलतांना, प्रथमेशने सुवर्ण जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला. आगामी स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी करुन भारताला सुवर्ण पदक जिंकून देण्याच स्वप्न असल्याच यावेळी प्रथमेशने सांगितले. आगामी काळात चीनमध्ये होणाऱ्या आशीयाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्या मानस आहे, असे प्रथमेशने सांगितले.
आनंद महिद्रांनी केलं कौतुक
भारताचे यशस्वी उद्योजक आनंद महिंद्रा ट्विटरवर सक्रिय असतात. ते आपल्या फॉलोवर्सला रिप्लायही देतात. त्यांचा हाच स्वभाव त्यांना इतर उद्योजकांपासून वेगळा बनवतो. त्यांचा मिश्कील स्वभाव आणि त्यांची हजरजबाबी मुळे ते ट्वीटरवर प्रसिध्द आहेत. त्यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्यांना थार गाडी गिफ्ट देवून त्यांचा सम्मानही केला आहे. त्यातच आता त्यांनी प्रथमेशचे कौतुक करत एक ट्विटही केलंय.यासोबतच एस एस राजामौली, अनुपम खेर यांनीही त्याचे कौतुक केले.