अपेक्षा सकपाळ, Tv9 मराठी : महाराष्ट्र ही भूमी संतांची, महापुरुषांची. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत नामदेव असे अनेक संत परंपरा या भूमीत पहायला मिळतात. संतांची ही परंपरा आता निरुपणकार पुढे नेत आहेत. याच निरुपणकारांमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी. महाराष्ट्रातील समाज प्रबोधनात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. ज्येष्ठ निरूपणकार, समाजसेवक अशी ओळख असेलेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर झाला.
पुरस्कार वितरण सोहळ्याची जंगी तयारी सुरु झाली. १६ एप्रिल ही तारीख ठरली. आमंत्रणे गेली. मंडप सजले. महाराष्ट्रातून लाखो ‘श्री’सदस्य हा पुरस्कार मिळताना ‘याची देही, याची डोळा’ पहावा यासाठी खारघरला आले. मात्र, याच पुरस्कार सोहळ्यात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे १५ ‘श्री’सदस्यांचा मृत्यू झाला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार सोहळ्याला लागलेलं हे गालबोट. महाराष्ट्राला लाजवणारी अशी ही दुर्घटना.
खारघरच्या ‘त्या’ दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, न्यायालयीन चौकशी, शिंदे-फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असा एकापाठोपाठ एक मागण्या करत विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्या घटनेवर सरकारचा अबोला आणि विरोधकांची आक्रमकता या खेळी सुरु झाल्या. राजकारण म्हणून अनेक नेते जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले.
महाराष्ट्राचं राजकारण या एका घटनेमुळे ढवळून निघालं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र, यात ‘श्री’सदस्यांना कुटुंब मानणारे आप्पासाहेब यांनी ना समाज माध्यमांवर बाजू मांडली, ना मृताच्या नातेवाईकांची चौकशी केली, ना रुग्णालयात असलेल्या जखमींची चौकशी केली. आप्पासाहेब धर्माधिकारी या काळात होते तरी कुठे ?
रायगड जिल्ह्यातलं तुटवली हे माझं गाव. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग याच रायगड जिल्ह्यात आहे. आप्पासाहेबांच्या बैठकीला माझी आजी जायची. आप्पासाहेब हेच तिच्यासाठी गुरु होते. आप्पासाहेबांनी रायगड जिल्ह्यात अनेक समाजसेवेची कामे केली आहेत. निशुल्क रक्तदान शिबिर, रोजगार मेळावा, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले.
राज्यभरात लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. महाराष्ट्राचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ते गुरु. निरुपणकार आप्पासाहेब यांना मानणारा वर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजहट्ट धरला. पुरस्कार सोहळ्याची मोठी जय्यत तयारी केली. हा एक प्रकारे पॉलिटिकल इव्हेंटच होता. पण या कार्यक्रमाचे नियोजन अघोरी असेच म्हणावे लागेल.
पुरस्कार सोहळ्यात मंत्री, आमदार व्हीआयपी छताखाली तर ‘श्री’सेवक मात्र उन्हात तापत होते. सोहळ्याला लाखोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘श्री’सदस्य आले. उन्हाच्या तीव्र झळा, पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला, तहानेने जीव व्याकुळ झालेला. अखेर, याच उष्माघातामुळे १५ ‘श्री’सदस्यांचा बळी घेतला.
खारघरची दुर्घटना झाली आणि त्याच्या 24 तासानंतर धर्माधिकारी कुटुंबाकडून केवळ दुखवटा पाळण्यात आला. घरासमोरील रांगोळी पुसून, फुलांची आरास हटविण्यात आली. त्यानंतर एक पत्रक काढून या दुर्घटनेचं कोणी राजकारण करू नये असं सांगण्यात आलं. पण, त्याआधीच याचं राजकारण झालं होतच. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी रुग्णालयाला दिलेली भेट ही राजकीयच होती. परंतु, या सर्वांमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी अखेरपर्यंत शांत का राहिले हा मोठा प्रश्न आहे.
कार्यक्रम घेतला पण त्याची वेळ बदलली ती कुणाच्या सांगण्यावरून बदलली ? कार्यक्रमासाठी किती कोटींचा खर्च झाला, आयोजकांनी काय तयारी केली होती, जेवणाची, पाण्याची व्यवस्था का नव्हती ? त्याचे नियोजन कुणाकडे होते ? या कार्यक्रमासाठी एवढी गर्दी जमवणं खरंच गरजेचं होतं का ? हा कार्यक्रम भर दुपारी का घेतला ? साडेतीनशे एकरात ‘श्री’सदस्यांसाठी मंडपाची सोय का केली नाही ? १०-१५ कोटींचा खर्च केला मग ‘श्री’सदस्यांना जेवण आणि पाणी वेळेवर का नाही मिळाले ? असे एक ना अनेक प्रश्न समोरून येत आहेत.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तुफान वादावादी झाली. पण, आप्पासाहेब धर्माधिकारी यात कुठंही दिसले नाही. आप्पासाहेब ‘श्री’सदस्यांना आपलं कुटुंब मानतात. मग, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘श्री’सदस्यांची त्यांनी भेट घेतली ? मृत ‘श्री’सदस्यांची माहिती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी आप्पासाहेब गेले ? याचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असेच आहे.
आप्पासाहेब आपण पुरस्कार परत करणार असे म्हणालात. पण, तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या पुरस्कार सोहळ्यासाठी तुमच्याच ‘श्री’सदस्य येतात. त्यांचा दुर्घटतेत बळी जातो त्या तुमच्या मृत ‘श्री’सदस्यांच्या कुटुंबाला आपण काय आणि कोणती मदत करणार आहात ? नाही म्हणायला सरकारने पाच लाखांची मदत दिली. पण, आप्पासाहेब तुम्ही काय करणार आहात ? ‘बोला, आप्पासाहेब बोला’ या संपूर्ण दुर्घटनेवर आपण कधी बोलणार आहात ? तुमच्या बोलण्याची आज महाराष्ट्रासह बळी गेलेल्या ‘श्री’सदस्यांचे कुटुंबही वाट पहात आहेत.
( या लेखामधील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. TV9 मराठी याच्याशी सहमत असेलच असे नाही. )