नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे 2, तर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ या पक्षांकडे आहे. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केलीय. तसंच सर्व पक्षांनी समर्थन देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. अशावेळी भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मोठी खेळी खेळण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जात आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या बैठकीत संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते, असी माहितीही सूत्रांनी दिली आहे. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं ही रणनिती आखल्याचं कळतंय.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना त्यांनी मदतीचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनीही संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजेंना सहकार्य करेल असं जाहीर केलं होतं. मात्र, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेना दुसरा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.
दुसरीकडे शिवसेनेकडून संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली होती. शनिवारीही उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांची भेट झाली होती. त्यावेळीच संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याचं बोललं जात होतं.