कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल (Rajaram Sugar Factory Election Result) आज समोर येतोय. या निवडणुकीत 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात होते. तसेच या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. विशेष म्हणजे सतेज पाटील यांनी महाडिक गटाला ललकारलं होतं. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद बघायला मिळाला होता. दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडलेल्या बघायला मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबतची उत्सुकता वाढली होती. कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष आहे.
छत्रपती रामाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. आज सकाळपासून मतमोजनी सुरु आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महादेवराव महाडिक विजयी झाल्याची माहिती आज दुपारीच समोर आली. त्यानंतर महाडिक गटाकडून जोरदार गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.
महादेवराव महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक गटाचे आणखी दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. महाडिक गटाचे उत्पादक गट क्रं 1 मधून विजय भोसले, संजय मगदूम विजयी झाले. दुसऱ्या फेरीतील पहिल्या गटात देखील महाडिक गटाने बाजी मारली. महाडिक गटाच्या उमेदवारांनी जवळपास 1357 मताधिक्याने विजय मिळवला. महाडिक गटाचे आतापर्यंत 21 पैकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे तीन उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महाडिकांच्या मागे आम्ही किती ताकतीने उभे आहोत हे सभासदांनी दाखवून दिलं. हा विजय सहजासहजी मिळाला नाही. त्यांनी पुन्हा महाडिकांचा नाद करू नये. आता दाखवलं आहे. अजून पाहायचं असेल तर बघा आम्ही तयार आहोत. त्याचे किती कंडके तुम्हीच बघा. एका लाकडाचे दहा कंडके पडलेत. गुरु-शिष्य नात्याबद्दल त्याला माहित आहे का? त्याला (सतेज पाटील) आता खान्देशला पाठवा”, अशी प्रतिक्रिया महादेवराव महाडिक यांनी दिली.
“सभासदांनी बंटी पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांचे कंडके पाडले. सतेज पाटील आणि त्यांच्या मोठ्या बंधूंनी सभासदांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण सभासदांनी त्यांना झिडकारलं आहे. सभासदांनी त्यांचे कंडके केले. विरोधकांनी विखारी प्रचार केला. पण अमल महाडिक यांनी विचारे प्रचार केला. महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही असं म्हणत होते. राज्यसभेनंतर आता पुन्हा एकदा आम्हाला गुलाल लागलाय. सतेज पाटील यांची उतरती कळा सुरू झाली आहे”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.
“आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही त्याची काही कारणं आहेत. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. बाहेरचे काही वाढीव सभासद होते त्यामुळे हा पराभव झाला. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली ती जायला नको होती. आता सत्ताधारी यांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण करावीत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सभासदांच्या पाठीशी कायम राहणार. निवडणुका होत असतात. यापुढे देखील होतील. एका निवडणुकीनं खचून जाण्याचं कारण नाही. निवडणुकीत हार-जीत ही होत असते. मला उतरती कळा लागली आहे की नाही ते जनता ठरवेल”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.