नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच शिंदे गटात इन्कमिंग सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. एकनाथ शिंदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीमध्ये काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी (Shivsena) हा मोठा धक्का माणण्यात येत आहे. काशिनाथ मेंगाळ यांच्या शिंदे गाटातील प्रवेशामुळे इतगपुरी तालुक्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यभरातील शिवसेना पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक यांचे शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. यामुळे शिवसेनेसमोरील अडचणीत मात्र वाढ होत आहे.
विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच नाशिकच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या भेटीनंतर नाशिकमधील दहा हजार शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना एकनिष्ठतेचे प्रमाणापत्र देणार आहेत. असे असतानाच दुसरीकडे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मेंगाळ यांच्यासोबतच त्यांचे शेकडो कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा हा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाचा फटका हा पक्षाला मुंबई, ठाणे आणि नाशिक महापालिकेत देखील बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भिवंडीमध्ये देखील शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडीत आदित्य ठाकरे यांचा मेळावा पार पडला होता. सकाळी मेळावा पार पडला आणि संध्याकाळी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. भिवंडीप्रमाणेच ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. नवी मुंबई आणि कोकण विभागातील अनेक नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.