औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगत असतात. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले गेले आहे. पंकजा मुंडे यांनी वारंवार या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. पण औरंगाबाद शहारात लावलेल्या एका बॅनरमुळे नव्याच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर औरंगाबादमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर अगदी माजी पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत. अपवाद फक्त पंकजा मुंडे यांचा आहे.
भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून बॅनर लावले आहे. या बॅनरवर भाजपच्या सर्व आजी-माजी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु यामध्ये पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यात आला आहे. यामुळे भाजपमध्ये पंकजा मुंडे नाही का? असा सवाल प्रश्न पाहणाऱ्यांना पडत आहे.
मराठवड्यातीलच नव्हे तर राज्यातील महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना सातत्याने डावलण्यात येत आहे. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यांबरोबर त्या होत्या. यामुळे पक्षात त्यांना पुन्हा मानाचे स्थान मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु आता औरंगाबादमधील प्रकारामुळे पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.