मुंबई : वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. तर महाविकास आघाडीमुळेच वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर कोणामुळे गेला यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी खोटं न बोलता राज्यात गुंतवणूक आणावी असं लोंढे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
वेदातांवरून अतुल लोंढे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आरटीआयमध्ये माहिती मागितली जाते, आणि ती माहिती संध्याकाळी मिळते सुद्धा, आम्हाला तीस – तीस दिवस माहिती मिळत नाही. माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही अशी कारणे दिली जातात. काल पण खोटं बोलले आणि आज पण पुन्हा एकदा खोटं बोलले. त्यांना आठवत नाही आपण मागे काय बोललो होतो त्यामुळे पुन्हा एकदा ते खोटे बोलले आहेत. महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आपले आहेत. इथे क्रेडिट घेणं राजकारण करणं योग्य नाही. खोट न बोलता रोजगार आणला तर विरोधी पक्षदेखील तुमच्यासोबत आहे, असं म्हणत लोंढे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी विरोधकच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.