नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : विरोधकांनी संसदेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावर मतदानही झालं. हा अविश्वास ठराव फेटाळूनही लावण्यात आला. मोदी सरकारवर या अविश्वास ठरावाचा काहीच परिणाम झाला नाही. असं असलं तरी ठाकरे गटावर मात्र या अविश्वास ठऱावाचा परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. कारण या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांनी पाळला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार आहे. शिंदे गटाच्या खासदारानेच तसा दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा नवा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनीच ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई होणार असल्याचंही सांगितलं. लोकसभेचा अविश्वास ठराव आला त्याच दिवशी शिवसेनेच्या खासदारांना व्हीप पाठवला होता. मतदानावेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा रिमायंडर व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांना पाठवला होता. लोकसभेत शिवसेनेचे 5 खासदार अनुपस्थित होते. त्यांच्यावर कारवाई होईल. सोमवारी वकिलांशी चर्चा करून त्या सदस्यांना आम्ही नोटीस देणार आहोत. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळं भावना गवळी यांचाच व्हीप लागू होतो, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
काँग्रेसला टीका करायचा अधिकार नाही. कारण त्यांनी अधिवेशन चालू नये म्हणून गोंधळ घातला. अमित शाह पहिल्या दिवसापासून मणिपूरवर बोलायला तयार होते. मणिपूरबाबत पंतप्रधान किती संवेदनशील आहेत हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. मणिपूरबाबत एक दिवस आधीच अमित शाह बोलले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी जास्त बोलणं टाळलं. पण ते महत्वाचं बोलले आहेत, असं सांगतानाच जनतेच्या विकासासाठी गरजेची असलेली विधेयके मंजूर केली, असंही राहुल शेवाळे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असा कुठलाही कोल्ड वॉर नाही. राज्याच्या विकासासाठी तीन पक्ष काम करत आहेत. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. त्यासाठी कमिटी स्थापन करून जागावाटप आणि इतर चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळं यावर चर्चा होण्याचा प्रश्नच नाह, असंही त्यांनी स्पष्ट केलं.