नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : राजधानी नवी दिल्लीत G20 ची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. 8, 9 आणि 10 सप्टेंबरला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सेंट्रल दिल्ली बैठकीच्या निमित्ताने पूर्णपणे बंद राहणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या तीन दिवसांत दिल्ली सरकारची कार्यालये आणि दिल्ली महापालिकेची सगळी कार्यालये बंद राहणार आहेत. दिल्ली सरकारकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण दिल्लीमध्ये तीन दिवस सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नसणार आहे. या तीन दिवसांत सार्वजनिक वाहतूक, बस सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दिल्लीमधील सगळ्या बँका, वित्तीय संस्था, खाजगी कंपन्यांची कार्यालये, दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहणार आहेत.
या कालावधीत दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठे बदल केले जाणार आहेत. दिल्लीमधील मेट्रो स्टेशन्स आणि मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने दिल्ली आणि गुडगाव परिसरातील 30 पेक्षा जास्त हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.
25 पेक्षा जास्त देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष या शिखर परिषदेसाठी येणार आहेत. देश आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही दिल्लीत प्रवेश नसणार आहे. पर्यटकांनी या कालावधीत राजधानीत दिल्लीत येण्याचे टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.